"त्या" पीडितेला सहा लाखांची मदत
By Admin | Updated: June 11, 2017 02:28 IST2017-06-11T02:28:49+5:302017-06-11T02:28:49+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील रुईखेड मायंबा येथील प्रकरण: गुन्हेगारांवर कठोर कारवाईचे राजकुमार बडोले यांचे आश्वासन.

"त्या" पीडितेला सहा लाखांची मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : रूईखेड मायंबा येथील पीडितेला एक लाख रूपयांची मदत दिली असून, आणखी पाच लाख रूपयांची मदत देण्याचे आश्वासन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी शनिवारी सकाळी जिल्हा सामान्य रूग्णालयात दिले.
रूईखेड मायंबा येथील एका महिलेला गावातीलच काही नागरिकांनी मारहाण करून धिंड काढली होती. याप्रकरणी चर्मकार समाजाच्या विविध संघटनांनी आंदोलन करीत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी पीडित महिलेची शनिवारी सकाळी जिल्हा सामान्य रूग्णालयात भेट घेतली. यावेळी पीडितेने तिला झालेल्या मारहाणीची माहिती दिली.
गावातीलच काही नागरिकांनी मारहाण केली असून, आपल्यावर खोटे गुन्हे दाखल केले असल्याचे सदर पीडितेने सामाजिक न्यायमंत्री बडोले यांना सांगितले. सामाजिक न्याय मंत्री बडोले यांनी सदर महिलेला मुख्यमंत्र्यांच्या निधीतून पाच लाख रूपयांची मदत घोषीत केली. तसेच गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे सदस्य सी. एल थूल, जि. प अध्यक्ष उमा तायडे, माजी आमदार धृपदराव सावळे, माजी आमदार विजयराज शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना, तहसीलदार सुरेश बगळे, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त दीपक वडपुते, प्र. सहाय्यक आयुक्त निलेश यावलीकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत आदी उपस्थित होते.
सी.एल थूल यांची रूईखेड मायंबा येथे भेट
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे सदस्य सी .एल थूल यांनी १0 जून रोजी रूईखेड मायंबा येथे पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी घटनेची माहिती घेत कुटूंबीयांशी चर्चा केली. अँट्रासिटी कायद्यातंर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यांनुसार कठोर कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.