...त्यांना पुन्हा वाटले जीवन गोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:33 IST2021-09-13T04:33:21+5:302021-09-13T04:33:21+5:30
‘संपली काळी रात्र आता नवी सकाळ आहे, पुसल्या दुःखाच्या रेषा तेजस्वी माझे भाळ आहे... छळले ज्यांनी मला तो एक ...

...त्यांना पुन्हा वाटले जीवन गोड
‘संपली काळी रात्र आता नवी सकाळ आहे,
पुसल्या दुःखाच्या रेषा तेजस्वी माझे भाळ आहे...
छळले ज्यांनी मला तो एक काळ होता,
माणुसकीच्या हाती आज माझा सांभाळ आहे..!’
तीन-चार महिन्यांपूर्वीच दिव्या फाउंडेशनच्या वतीने खामगाव रोडवर वरवंड येथे दिव्य-सेवा निवासी पुनर्वसन प्रकल्प निराधारांच्या सेवेसाठी उभारण्यात आला आहे. संस्थापक-अध्यक्ष अशोक काकडे व त्यांचे सेवेकरी मनोरुग्ण, अनाथ व निराधार यांच्या सेवेसाठी तत्पर आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी नांदेड येथील दीपक पवार यांनी एका अनोळखी व्यक्तीला या प्रकल्पात दाखल केले होते. ती व्यक्ती स्वतःचे नावदेखील सांगू शकत नव्हती. बहुतेक आजारपणामुळे तो विस्मरणात गेला असावा; परंतु या आजारी व अनोळखी व्यक्तीला दिव्य-सेवा प्रकल्पातील देवदूतांनी त्यांची सेवा करीत डॉ. खर्चे यांच्याकडून वैद्यकीय उपचार केले. काही महिन्यांच्या कालावधीत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हायला लागली. दरम्यान, त्या व्यक्तीने आपले नाव सय्यद बाबूलाल असल्याचे सांगितले.
तो वृद्ध निघाला नांदेडचा
दीड महिन्यापूर्वी दिव्य सेवा प्रकल्पामध्ये आलेल्या त्या वृद्धाच्या नातेवाइकांचा अधिक शोध घेतला असता सय्यद बाबूलाल हे नांदेड येथील शिवाजी नगर पोलिस स्टेशनजवळ राहत असल्याचे समजले. अशोक काकडे यांनी त्यांच्या नातलगांशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले होते. नातलग दिव्य-सेवा प्रकल्पात येताच त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. महिन्यांपासून दुरावलेले सय्यद बाबूलाल आपल्या नातलगांना पाहून भावूक झाले होते. ही एक "ग्रेट भेट" होती जी दिव्या फाऊंडेशनने घडवून आणली आहे.