बुलडाणा जिल्ह्यात ५.५ लाख वृक्ष लावणार
By Admin | Updated: May 13, 2014 23:53 IST2014-05-13T22:42:22+5:302014-05-13T23:53:03+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत यावर्षीसाठी जिल्ह्यात ५ लाख ५८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे.

बुलडाणा जिल्ह्यात ५.५ लाख वृक्ष लावणार
बुलडाणा : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाच्यावतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शतकोटी वृक्ष लागवड योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत यावर्षी सन २0१४-१५ साठी जिल्ह्यात ५ लाख ५८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. दहा तालुक्यातील १0 रोपवाटिकेतून या रोपांचे संवर्धन केले जात आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टांमध्ये वाढ झाली आहे. शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत दरवर्षी पावसाळ्यात जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिल्या जाते. उद्दिष्टानुसार जिल्ह्यातील वनविभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, ग्रामपंचायत कृषी विभाग, सामाजिक वनीकरण, विविध सामाजिक संघटना व इतर विभागामार्फत या वृक्ष रोपणाचा उपक्रम राबविला जाणार आहे. घटलेले पर्जन्यमान आणि तापमानात झालेली वाढ पाहता वृक्षारोपण ही एकमेव काळाची गरज आहे, या उद्देशानेच या योजनेतून साग, शिसव, अकेशिया, सुबाभूळ, करंज, कांचन, मँग्झीन, आपटा, बहावा, गुलमोहर, निलगीर, ऑस्ट्रेयिन बाभूळ, कडूनिंब, काजू, आवळा, चिंच, काशीद, जांभूळ, सिल्व्हर ओक, रेन ट्री, चेरी, बदाम, बांबू, अशोक, शिकेकाई आदी प्रजातींचा रोपांचा समावेश आहे.