बाबासाहेबांच्या परिसस्पर्शाची स्मृती कायम
By Admin | Updated: April 14, 2015 00:49 IST2015-04-14T00:49:21+5:302015-04-14T00:49:21+5:30
बाबासाहेबांची बुलडाणा जिल्हा भेट दलितांमध्ये नवी चेतना भरणारी.

बाबासाहेबांच्या परिसस्पर्शाची स्मृती कायम
बुलडाणा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात २0 मार्च १९२७ रोजी शेकडो अस्पृश्यांनी महाडच्या चवदार तळ्यावर जाऊन तळ्याचे पाणी प्राशन केले व तत्कालीन प्रतिगामी, विषम, अन्यायी व्यवस्थेला आव्हान दिले. अस् पृश्यांना सार्वजनिक पाणवठे खुले करून देण्याचा तो समता संगर होता. हा सत्याग्रह केवळ पाण्याचा नसून, अस्पृश्य हे देखील माणसं आहेत, हे सिद्ध करण्याकरिता व समतेची मुहूर्तमेढ रोवून त्यांच्या हक्कासाठी संघर्ष करण्याची तयारी बाबासाहेबांनी सुरू केली होती. त्यासाठी ठिकठिकाणी सभा घेऊन उद्दिष्टे समाजावून सांगितल्या जाऊ लागले. याच पृष्ठभूमीवर बाबासाहेब बुलडाणा जिल्ह्याच्या भेटीवर आले असता त्यांनी दलितांमध्ये नवी चेतना भरण्याचे काम केले.
२९ मे १९२९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुलडाणा जिल्ह्यातील पातुर्डा येथे आले, त्यांनी पातुर्डा येथील विहीर खुली करून दिली. त्यांची ही पातुर्डा भेट केवळ एक घटना नसून, ती एक चळवळीतील ऐतिहासिक नोंद होती. बाबासाहेबांच्या आगमनाने जिल्ह्यातील दलित चळवळीला उभारी मिळाली. या भेटीनंतर अनेक कार्यकर्त्यांंनी चळवळीत स्वत:ला झोकून दिले. १९२९ च्या पातुर्डा भेटीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पुढे २६ मार्च १९३४ ला बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे आल्याची नोंद आहे. मलकापूर येथील अस्पृश्य महिलांच्या परिषदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संबोधित केले होते. मलकापूर येथील सार्वजनिक वाचनालयाच्या ऐतिहासिक मैदानावर येथील मडकेबुवा जाधव यांनी महिलांची ही परिषद भरविली होती. या परिषदेनंतर मडकेबुवा जाधव व त्यांच्या सहकार्यांनी बाबासाहेबांच्या चळवळीची धुरा खांद्यावर घेऊन ते जिल्हाभर जनजागृती करीत फिरत होते.
१४ आक्टोबर १९५६ च्या नागपूर येथील पहिल्या धर्मांंतर सोहळ्यानंतर दुसरा धर्मांंतर सोहळा चंद्रपूर येथे झाला. तर तिसरा ऐतिहासिक धर्मांंतर सोहळा बुलडाणा जिल्ह्यातील उंद्री या गावात घेण्याचा बहुमान मिळाला. बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी बॅ. खोब्रागडे यांच्या नेतृत्वात ५0 हजार समाज बांधवांच्या उपस्थितीत हा धर्मांंतर सोहळा पार पडला होता. सारा भारत बौद्धमय करेल हे बाबासाहेबांचे स्वप्न तडीस नेण्यासाठी तत्कालीन त्यांचे सहकारी यांनी विदर्भ, मराठवाडा, खान्देश असा सुवर्णमध्य साधणारे व रेल्वे लाईनला लागून शेगावपासून काही अंतरावरील उंद्री गावाची निवड केली होती. त्यासाठी दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली प्रेशिडियन्ट कमिटी नियुक्ती करण्यात आली हो ती.