महिला संरक्षणाबाबत कायद्याची प्रभावी अंमलबजावणी नाही

By Admin | Updated: August 25, 2014 02:23 IST2014-08-25T02:16:21+5:302014-08-25T02:23:30+5:30

अ.भा.जनवादी महिला संघटनेच्या अध्यक्षा किरण मोघे यांची शेगाव येथे पत्रकार परिषद.

There is no effective enforcement of law on women's protection | महिला संरक्षणाबाबत कायद्याची प्रभावी अंमलबजावणी नाही

महिला संरक्षणाबाबत कायद्याची प्रभावी अंमलबजावणी नाही

शेगाव : फुले, शाहु, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात गेल्या काही वर्षामध्ये महिला, दलीत, आदिवासींवरील अन्याय अत्याचारामध्ये वाढ होत आहे. मात्र पोलीस आणि प्रशासनाकडून यावर अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. पोलीस यंत्रणेमधील पुरुषप्रधान दृष्टीकोन, भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमता यामुळे गुन्ह्यांची नोंदच होत नाही आणि झाली तर योग्य तपासाअभावी न्यायालयात गुन्हेही सिध्द होण्याचे प्रमाण असमाधानकारक आहे, अशी टिका अ.भा.जनवादी महिला संघटनेच्या अध्यक्षा किरण मोघे यांनी पत्रकार परिषदेत के ली.
राज्य शसनाकडून स्त्रियांच्या कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी पुरेशी यंत्रणा उभी केलेली नाही. उदा. हुंडाप्रतिबंधक कायदा आणि कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, नव्याने पारित केलेल्या कामाच्या ठिकाणी लैगिंक अत्याचार विरोधी कायदा अंतर्गत जिल्हाधिकार्‍यांच्या नेतृत्वात स्थानिक तक्रार निवारण समिती स्थापन केलेल्या नाहीत.
आजच्या या जागतिकीकरण व भांडवली अर्थव्यवस्थेत स्त्रीदेहाच्या बाजारु प्रतिमेला प्रसारमाध्यमेही प्रोत्साहन देत आहेत. स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन एक उपभोग्य वस्तु म्हणून झालेला आहे. महाराष्ट्रात खोट्या प्रतिष्ठेपायी होणार्‍या स्त्रियांच्या हत्या किंवा त्याची अवहेलना हा सुध्दा गंभीर विषय बनत चालला आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या नावावर ही गोष्ट एक कलंक आहे. यासंदर्भात अ.भा.जनवादी महिला संघटनेच्यावतीने देशभर आणि राज्यभर चळवळ चालवित आहोत.
एकुणच आज महिला, दलित व आदिवासींवरील अन्याय-अत्याचार थांबविण्यासाठी समाजाच्या सर्व स्तरातील पुरोगामी विचारवंत, सामान्य नागरिक व पत्रकारांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे मतही यावेळी किरण मोघे यांनी व्यक्त केले. यावेळी सुधीर देशमुख, पंजाबराव गायकवाड आदींची उपस्थिती होती.

Web Title: There is no effective enforcement of law on women's protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.