योगिताच्या उपचाराकरिता दानशुरांनी पुढे येण्याची गरज
By Admin | Updated: April 17, 2017 01:09 IST2017-04-17T01:09:07+5:302017-04-17T01:09:07+5:30
संग्रामपूर- उरळ ते मोरझाडी रस्त्यावर दुचाकीत ओढणी अडकल्याने २१ वर्षीय योगिता अपघातात जबर जखमी झाली. मेंदुला मार लागल्याने ती कोमात असून, अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

योगिताच्या उपचाराकरिता दानशुरांनी पुढे येण्याची गरज
लोकमत मदतीचा हात
संग्रामपूर : तालुक्यातील पातुर्डा खुर्द येथील अत्यल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलीवर उपचारासाठी दानशुरांनी पुढे यावे, असे आवाहन आपद्ग्रस्त शेतकऱ्याकडून करण्यात आले आहे. तालुक्यातील पातुर्डा खुर्द येथील रहिवासी गजानन झाडोकार यांची २१ वर्षीय मुलगी दुचाकीने जात असताना उरळ ते मोरझाडी रस्त्यावर दुचाकीत ओढणी अडकल्याने ५ एप्रिल रोजी झालेल्या अपघातात जबर जखमी झाली. या अपघातात तिच्या मेंदुला मार लागल्याने ती कोमात असून, तिच्यावर अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आतापर्यंत तिच्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या असून, तिच्या उपचाराकरिता वडिलांना दोन लाख रुपये खर्च आतापर्यंत आला आहे. तिच्या वडिलांकडे एक एकर कोरडवाहू शेत असून, आतापर्यंत शेतातील सर्व उत्पन्नाचा पैसा व नातेवाईकांकडून उसनवार घेऊन तिच्यावर उपचार केले आहेत. दरम्यान, १५ एप्रिल रोजी योगीताला नागपूर येथे हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मात्र आता नातेवाईकांकडून घेतलेली उसनवार व जवळचा सर्वच पैसा उपचाराकरिता लागल्याने पुढील उपचाराकरिता आर्थिक मदतीची गरज आहे. योगिताच्या वडिलांकडे एकच एकर शेती असल्यामुळे ते मोलमजुरी करून कुटुंबांचा उदरनिर्वाह करीत आहेत. त्यांचा एक मुलगा प्रवीण यांचे १२ वी चे शिक्षण सुरू आहे, तर दुसरा मुलगा वैभव यांचे ११ वीचे शिक्षण सुरू आहे. योगिताचे शिक्षण या गरीब कुटुंबातून बी.ए. द्वितीय वर्षापर्यंत झाले आहे. उपचाराकरिता अर्थसहाय्य करण्यास दानशुरांनी पुढे यावे. याकरिता गजानन रामकृष्ण झाडोकार यांच्या सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या पातुर्डा शाखेच्या खाते क्रमांक २९६९५४१४९० आयएफसी कोड नं.२८१७२४ मध्ये मदतीची रक्कम जमा करावी, असे आवाहन झाडोकार परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.
लग्नाआधी घडला अपघात
जखमी असलेल्या योगिता गजानन झाडोकार हिचे लग्न १७ एप्रिल रोजी ठरले होते. त्यामुळे योगिता ५ एप्रिल रोजी पातुर्डा खुर्द येथून मोरझाडी येथे चुलतमावशीच्या गावी जेवणासाठी बोलविल्याने जात होती. दरम्यान, उरळ गावाजवळून मोरझाडी येथे जात असताना तिची ओढणी दुचाकीत अडकून अपघात झाला.