मेहकर येथे एकाच रात्री पाच ठिकाणी चो-या
By Admin | Updated: December 15, 2014 23:45 IST2014-12-15T23:45:55+5:302014-12-15T23:45:55+5:30
शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण; श्वान पथक हतबल.

मेहकर येथे एकाच रात्री पाच ठिकाणी चो-या
मेहकर (बुलडाणा): शहरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, १४ डिसेंबरच्या एकाच रात्री ५ ठिकाणी चोर्या झाल्याची घटना घडली. त्यामुळे शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, शहरातील शेळके कॉलनीत राहणार्या पं.स. कर्मचारी सुनिता संजय काळुसे या नाशिक येथे मुलाला भेटण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील व घरातील साहित्याची फेकाफेक केली. याच घरापासून काही अंतरावर जाफ्राबाद येथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी राम गायकवाड यांच्या घराचाही दरवाजा तोडून चोरीचा प्रयत्न झाला; तसेच शिक्षक कॉलनीतील मणिराम गुळवे, शिक्षक दिवठाणे यांचेही घर अज्ञात चोरट्यांनी फोडले आहे. त्यानंतर लाईनमन मंगवडे यांच्या घराचा कोंडा तोडत असताना झालेल्या आवाजामुळे घरातील मंडळी जागी झाली. त्यामुळे चोरट्यांनी घटनास्थळावरुन पोबारा केला. एकाच रात्री पाच ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याने शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळावर श्वान पथक पाचारण केले होते; मात्र काहीच फायदा झाला नाही. अद्याप एकूण झालेल्या चोरीचा आकडा समजू शकला नसून, पुढील तपास सुरु आहे. याप्रकरणी पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.