म्हसला येथे तीन लाखांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2017 01:10 IST2017-03-24T01:10:36+5:302017-03-24T01:10:36+5:30
अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल

म्हसला येथे तीन लाखांची चोरी
धाड(जि. बुलडाणा), दि. २३- धाडपासून साधारण: ५ कि.मी. अंतरावर असलेल्या बुलडाणा तालुक्यातील म्हसला खु. या गावात कालरात्री अज्ञात चोरट्यांनी दोन ठिकाणी जबर घरफोडी करुन साधारण तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला असल्याची घटना घडली.
म्हसला खु. येथील देवराव लक्ष्मण तायडे या शेतकर्याचे घराचे समोरच्या दरवाजातून प्रवेश मिळवत मागील घरात असणार्या लोखंडी कपाट व लोखंडी पेट्यामधून नगदी रोख ६४ हजार व सोन्याच्या बांगड्या, गहूपोत, चांदीचे दागिने व अंगठी, असा एकूण दोन लाख रु. पेक्षा अधिक मालमत्ता चोरट्यांनी लंपास केली.
देवराव तायडे यांनी मागीलवर्षी घराचे बांधकाम केले यासाठी त्यांनी हातउसने पैसे घेतले होते. ते परत करण्यासाठी सोयाबीन, मका, हरभरा विकून पैसा घरी ठेवला होता. मात्र २२ रोजी रात्री चोरट्यांनी घरातील मालमत्तेवर हातसाफ करुन शेतकर्याची दैना केली आहे. तर त्यांचे घरानजीक काही अंतरावर अशोक रामभाऊ तायडे यांचे घरातही चोरट्यांनी मागील बाजूने प्रवेश मिळवत घरातील २५ हजार रु. रोख रक्कम, चांदीचे कडे व दागिने, असा साधारण एक लाखापेक्षा अधिक ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याठिकाणी दोनही घरातील लोखंडी पेट्या व कोठी ह्या चोरट्यांनी उचलून नेऊन नदीमध्ये टाकल्या होत्या, तर अशोक तायडे यांचा मुलगा श्रीकृष्ण तायडे यांचा मोबाइल फोनही चोरट्यांनी लंपास केला.
विशेष म्हणजे या दोनही घरात एवढी चोरीची घटना घडली तेव्हा घरातील सर्व सदस्य घरात झोपून होते, अशा स्थितीत चोरीची घटना घडली. या चोरीची घटनेत चोरट्यांनी बेशुद्धीचे औषधी वा स्प्रे यांचा वापर केला असावा. जेणेकरुन घरातील कुठलाही सदस्य उठला नाही.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा केला तर पोलीस उपविभागीय अधिकारी बी.बी. महामुनी यांनी घटनास्थळ पाहणी करुन तपासाचे निर्देश दिले. या घटनेत अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. तपास ठाणेदार सुनील जाधव व त्यांचे सहकारी करत आहेत.
चोरीच्या घटनेने धाड परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.