ठाणेदारास धमकी
By Admin | Updated: November 17, 2014 00:44 IST2014-11-17T00:44:20+5:302014-11-17T00:44:20+5:30
मातोळा तालुक्यातील प्रकार, चंदा बढेसह इतरावर गुन्हे दाखल.
_ns.jpg)
ठाणेदारास धमकी
मोताळा (बुलडाणा): धामणगाव बढे पोलिस स्टेशनचे दुय्यम ठाणेदार भोसले यांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. तसेच जिल्हाधिकारी यांच्या जमाव बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख चंदा बढेसह इतरावर गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई १५ नोव्हेंबर रोजी करण्यात आली.
धामगणगाव बढे पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले दुय्यम ठाणेदार उमेश बालाजी भोसले (३0) हे काल शनिवारी धामणगाव बढे पोलिस ठाण्यात कार्यालयीन कामकाज करीत असताना मुन्ना ऊर्फ सुरज संजय बढे हा मोबाईलचे सीमकार्ड हरविल्याची तक्रार देण्यासाठी आला होता. दरम्यान, तक्रार देण्याच्या कारणावरून सुरजने पोलिस उपनिरीक्षक उमेश भोसले यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
त्यानंतर त्याने चंदा संजय बढे, संजय बढे, गजानन बढे, बाळू बढे व इतरांना ठाण्यात बोलाविले. यावेळी उपरोक्त लोकांनी दुय्यम ठाणेदार भोसले यांना ईल शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला. प्रकरणी दुय्यम ठाणेदार भोसले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास ठाणेदार सेवानंद वानखडे हे करीत आहेत. या घटनेमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.