अन् रुग्णवाहिका घेऊन तुपकर थेट धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:35 IST2021-04-24T04:35:36+5:302021-04-24T04:35:36+5:30
बुलडाणा : तब्बल पाच तास फिरूनही औषधोपचाराची सोय होत नसल्याने आईला गमावण्याची वेळ मुलांवर आली हाेती. या ...

अन् रुग्णवाहिका घेऊन तुपकर थेट धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात!
बुलडाणा : तब्बल पाच तास फिरूनही औषधोपचाराची सोय होत नसल्याने आईला गमावण्याची वेळ मुलांवर आली हाेती. या गंभीर बाबीची माहिती समजताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी रुग्णवाहिका थेट जिल्हाधिकारी कार्यालयात व जिल्हाधिकारी कक्षासमोर नेऊन आपला रुद्रावतार दाखविला. त्यांच्या आक्रमकतेमुळे या वृद्ध महिलेवर अखेर उपचार सुरू झाले़
मोताळा तालुक्यातील कोऱ्हाळा बाजारनजीक असलेल्या आणि मराठवाड्याच्या सीमेवरील मोलखेडा येथील ६५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली. महिलेची प्रकृती गंभीर झाल्याने मुलगा व मुलीने एका रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलिंडर लावून आईला बुलडाणा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्या ठिकाणी एकही बेड शिल्लक नसल्याचे सांगितल्याने त्यांना परत फिरावे लागले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही आईचा जीव वाचविण्याकरिता दोघा बहीण-भावांनी खासगी रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. शहरातील सुमारे दहा दवाखाने फिरल्यानंतरही त्यांना बेड आणि ऑक्सिजन उपलब्ध नसल्याचे सांगत परत पाठविण्यात आले. पाच तास फिरल्यानंतर मुले मेटाकुटीस आली. तेवढ्यात हतबल झालेल्या मुलास कुणीतरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचा मोबाईल नंबर दिला. सायंकाळी ४ वाजता फोन येताच तुपकर प्रशासनाप्रती संतापले. त्यांनी धावाधाव केली; परंतु बेड आणि ऑक्सिजनची व्यवस्था होत नसल्याने तुपकर थेट रुग्णवाहिकेत रुग्ण महिलेला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. सायरन वाजवीतच ॲम्बुलन्स चक्क जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आल्याने यंत्रणा खडबडून जागा झाली. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती व्हीसीमध्ये बसलेले होते. काही वेळातच प्रभारी अपर जिल्हाधिकारी भूषण अहिरे बाहेर आले. यावेळी तुपकर यांनी संताप व्यक्त केला. तुपकर यांचे उग्र रूप पाहताच जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणा हलविली. अखेर महिलेवर उपचार सुरू झाले
प्राणवायू ८० वर
वृद्ध महिलेच्या ऑक्सिजनची लेवल ८० वर आली होती. त्यामुळे तिला ऑक्सिजनची नितांत गरज होती. रुग्णवाहिकेत ऑक्सिजन लावण्यात आला. मात्र, कोणत्याच दवाखान्यात भरती केले जात नव्हते, त्यातच ऑक्सिजन सिलिंडरही संपत आले होते. सकाळी ११ ते सायंकाळी ४, अशा पाच तासांपर्यंत हे कुटुंबीय फिरत होते.