‘स्वाभिमानी’ने वाहिले एटीएमला हळद-फुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2017 00:56 IST2017-04-12T00:56:00+5:302017-04-12T00:56:00+5:30
बुलडाणा- स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संगम चौकातील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमला सोमवारी हळदी-कुंकू व फुले वाहून अनोखे आंदोलन करण्यात आले.

‘स्वाभिमानी’ने वाहिले एटीएमला हळद-फुले
बुलडाणा : शहरातील जवळपास सर्वच एटीएम केंद्रामध्ये बँकाकडून रक्कम टाकली जात नसल्याने एटीएममध्ये नोटांचा ठणठणाट निर्माण झाला आहे. जनतेची होत असलेली गैरसोय दूर केली जात नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संगम चौकातील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमला सोमवारी हळदी-कुंकू व फुले वाहून अनोखे आंदोलन करण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम विदर्भप्रमुख राणा चंद्रशेखर चंदन व जिल्हाध्यक्ष संतोष राजपूत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करून रोष व्यक्त करण्यात आला. हजार, पाचशे रूपयाच्या नोटा चलनातून बाद झाल्यापासून एटीएमवर नोटा टंचाईची परिस्थिती उद्भवली आहे. विविध बँकामध्ये खाते असलेल्या नागरिकांच्या सेवेत बँकांनी सुरू केलेल्या एटीएममध्ये २४ तास रक्कम उपलब्ध राहत नाही. या एटीएममध्ये मिळतील, त्या केंद्रात रक्कम मिळेल या आशेने एटीएमकार्डधारक शहरभर फिरताना दिसत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने संगम चौकातील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमला पुष्पहार अर्पण करून आंदोलन केले. आंदोलनात ज्ञानेश्वर जगताप, शत्रुघ्न तुपकर, कैलास जगताप, गंगाधर तायडे, डॉ.भानुदास जगताप, पिंटू जाधव, विशाल जाधव, सागर काळवाघे यांच्यासह कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.