लाच घेणारा सहाय्यक संचालक निलंबीत

By Admin | Updated: November 30, 2014 23:23 IST2014-11-30T23:23:30+5:302014-11-30T23:23:30+5:30

मासिक मानधनाचे बिल काढण्यासाठी स्विकारली होती लाच.

Suspended assistant director of bribe | लाच घेणारा सहाय्यक संचालक निलंबीत

लाच घेणारा सहाय्यक संचालक निलंबीत

बुलडाणा : पाच हजार रूपयाची लाच स्विकारताना रंगेहात पकडण्यात आलेले प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाचे सहाय्यक संचालक शिवाजी निंबाळकर यांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले. त्यांचा पदभार मेहकर येथील सहाय्यक सरकारी वकिल गायकवाड यांचेकडे देण्यात आला.
सहाय्यक सरकारी वकिल रामदास तिडके यांचे मासिक मानधनाचे बिल काढण्यासाठी जिल्हा सहाय्यक संचालक शिवाजी निंबाळकर यांनी ५ हजार रूपयाची लाच मागीतली होती. २७ नोव्हेंबर रोजी ५ हजार रुपये लाचेची रक्कम घेताना अकोला येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या अधिकार्‍यांनी छापा टाकून निंबाळकर यांना रंगेहात पकडले होते. याचा अहवाल लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधिक्षक यु.के. जाधव यांनी मुंबई कार्यालयाला पाठविताच निंबाळकर यांना मुंबईच्या संचालक, सहाय्यक अभियोग संचालनालय यांनी निलंबीत केल्याची माहिती सुत्रांनी दिली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टामध्ये सरकारी वकीलांच्या रिक्त जागा मानधन तत्वावर भरल्या जातात. हे मानधन तत्वावर काम करणारे सहाय्यक सरकारी वकील जिल्हा सहाय्यक संचालक यांच्या अंतर्गत काम करतात. सिंदखेडराजा न्यायालयात सहाय्यक सरकारी वकिल म्हणून शिवाजी निंबाळकर काम पहात होते. तर त्यांच्याकडेच जिल्हा सहाय्यक संचालक पदाचाही पदभार होता. त्यामुळे सरकारी वकिलांचे मानधनाचे बील काढण्याचे काम निंबाळकर यांचेकडे होते. यासाठी निंबळकर हे जिल्हाभरात नियुक्त केलेले सहाय्यक सरकारी वकिल यांना नेहमीच पैशाची मागणी करीत होते. त्यामुळे सहाय्यक सरकारी वकिल त्रस्त झाले होते. त्यातीलच एक रामदास तिडके यांनी निंबाळकर यांची अकोला येथील लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानुसार अकोला एसीबीचे उपअधिक्षक यु.के.जाधव यांनी सापळा रचून शिवाजी निंबाळकर यांना २७ नोव्हेंबर रोजी बुलडाणा येथील कारंजा चौकात ५ हजार रुपयाची लाच घेताना पकडले. तर २९ नोव्हेंबर रोजी निंबाळकर यांना संचालक सहाय्यक अभियोग संचालनालय मुंबई यांनी निलंबीत केले आहे.

Web Title: Suspended assistant director of bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.