विष पिऊन आत्महत्या, मृताची ओळख पटली
By अनिल गवई | Updated: April 6, 2024 19:42 IST2024-04-06T19:42:17+5:302024-04-06T19:42:29+5:30
या प्रकरणी पुढील तपास खामगाव शहर पोलिस करत आहेत.

विष पिऊन आत्महत्या, मृताची ओळख पटली
खामगाव : विषारी द्रव्य प्राशन करून एका व्यक्तीने आत्महत्या केली. ही घटना खामगाव-शेगाव रोडवरील एका शाळेच्या मागील बाजूला शनिवारी दुपारी उघडकीस आली. दरम्यान, मृतदेह आढळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.
प्राप्त माहितीनुसार, शेगाव रोडवरील एसएसडीव्ही शाळेच्या पाठीमागे अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे शहर पोलिसांचे एक पथक घटनास्थळी धडकले. विषारी द्रव्य प्राशन केलेल्या व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नातेवाईकांनी विनोदसिंग शरदसिंग गौर (४२) अशी त्याची ओळख पटवली. त्यानंतर त्याला तत्काळ सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तपासणीअंती डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनास्थळी विषाची बाटली सापडल्याने विनोदसिंग यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याचा दावा पोलिस सूत्रांनी केला आहे. या प्रकरणी पुढील तपास खामगाव शहर पोलिस करत आहेत.