अपु-या खोल्यांमुळे विद्यार्थ्यांनी सोडविला मंडपात पेपर
By Admin | Updated: February 24, 2015 00:06 IST2015-02-24T00:06:52+5:302015-02-24T00:06:52+5:30
इयत्ता १२ वीची परीक्षा; संग्रामपूर येथील प्रकार.

अपु-या खोल्यांमुळे विद्यार्थ्यांनी सोडविला मंडपात पेपर
वरवट बकाल (संग्रामपूर, जि. बुलडाणा) : परीक्षा केंद्रावर जागा अपुरी पडल्याने संग्रामपूर येथील संत गुलाबबाबा विद्यालयात विद्यार्थ्यांना १२ वीचा इंग्रजी विषयाचा पेपर २३ फेब्रुवारी रोजी मंडपात बसून सोडवावा लागला. संग्रामपूर येथील संत गुलाबबाबा विद्यालय या परीक्षा केंद्रावरुन खेर्डा, जामोद, कवठळ, निवाणा व संग्रामपूर या पाच गावातील ४७0 विद्यार्थी १२ वीचा इंग्रजी पेपर देण्यासाठी प्रविष्ठ आहेत. यामध्ये जामोद येथील संत गाडगेबाबा कला व वाणिज्य क. महाविद्यालय, निवाना येथील विक्रमराव बाप्पुसाहेब देशमुख, खेर्डा येथील महात्मा फुले क.महाविद्यालय, संग्रामपूरचे संत गुलाबबाबा कनिष्ठ महाविद्यालय तसेच कवठळ येथील महाविद्यालय अंतर्गत असलेले १२ विचे विद्यार्थी संग्रामपूर येथील संत गुलाबबाबा विद्यालयात इंग्रजी या विषयाचा बोर्डाचा पेपर देण्यासाठी २३ फेब्रुवारी रोजी आले होते. या पाच महाविद्यालयाची विद्यार्थी संख्या भरपूर झाल्याने व त्यांना बसण्याची व्यवस्था नसल्याने परीक्षा केंद्रप्रमुखांसमोर पेच निर्माण झाला होता. शेवटी या २0 ते २५ विद्यार्थ्यांंना खोलीच नसल्याने त्यांना बाहेर वरांड्यात मंडपामध्ये बसून पेपर द्यावा लागला. एकूणच परीक्षा केंद्र देताना परीक्षा मंडळाकडून माहिती घेतल्या जाते. त्यानंतर नियोजन करुन विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र देण्यात येते. मात्र तरीही असा प्रकार घडल्याने पालकांमध्ये आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. तसेच परीक्षा मंडळाने यापुढे तरी विद्यार्थ्यांंची ऐनवेळी अशी गैरसोय करु नये, अशी मागणी पालकांकडून केल्या जात आहे. एकूणच विद्यार्थ्यांंना बसण्यासाठी खोली नव्हती तरी केंद्रप्रमुख तसेच शिक्षकांनी तातडीने पर्यायी व्यवस्था केल्याने परीक्षा वेळेवरच सुरु झाली, हे विशेष.