फुलांच्या स्वागताने विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

By Admin | Updated: June 27, 2016 02:32 IST2016-06-27T02:32:46+5:302016-06-27T02:32:46+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील २३५७ शाळांमध्ये कार्यक्रम : आज वाजणार शाळेची पहिली घंटा.

Student's entrance to flowering reception | फुलांच्या स्वागताने विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

फुलांच्या स्वागताने विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

बुलडाणा : तब्बल दोन महिन्यांच्या सुट्टय़ांनंतर सोमवारी शाळा सुरू होत आहे. इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर शाळेत आल्यानंतर मुलांना शाळेबद्दल गोडवा निर्माण व्हावा तसेच नवप्रवेशितांना शाळेची भीती वाटू नये, यासाठी राज्य सरकार विविध प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यातील एकूण २३५७ शाळांील पहिला दिवस आनंददायी करण्यासाठी शासनाने प्रवेशोत्सव ही संकल्पना अस्तित्वात आणली आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी २७ जून रोजी विद्यार्थ्यांंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत, तर दुपारच्या जेवणात मुलांना गोडधोड खाऊ घालण्यात येणार आहे. शाळेचा पहिला दिवस म्हणजे सारे काही नवे. आई नाही, बाबा नाही, घरचे कुणी नाही; शिक्षकही नवे आणि आसपासची इतर मुलेही नवीच. शाळेचा पहिला दिवस हा सहसा असाच असतो. त्याअंतर्गत शाळांनी तयारी पूर्ण केली असून, शाळेतील शिक्षकांना सकाळी लवकर शाळेत हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे. दाखल झालेले विद्यार्थी आणि उपस्थित शिक्षकांची माहिती शासनाला ऑनलाइन कळविली जाणार आहे. गेल्या आठवडाभरापासून चिमुकल्यांच्या शाळेची जी तयारी केली जात होती, ती आता थंडावणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात सोमवारी होत आहे. विद्यार्थ्यांंनीही नवी पुस्तके, दप्तर आणि गणवेशाची खरेदी केली असून, शाळेत जाण्यासाठी त्यांचाही उत्साह शिगेला पोहोचला आहे. जिल्ह्यातील काही खासगी संस्थेच्या शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, नगरपालिका तसेच उर्वरित खाजगी संस्थेच्या शाळेमध्ये प्रवेशोत्सव साजरा होणार आहे. यासाठी शिक्षण विभाग सज्ज झाला असून, विद्यार्थ्यांंचे स्वागताची तयारी करण्यात आली आहे.

Web Title: Student's entrance to flowering reception