दुधा येथे वसतिगृहाच्या विद्यार्थ्यास बेदम मारहाण
By Admin | Updated: March 22, 2017 01:49 IST2017-03-22T01:49:47+5:302017-03-22T01:49:47+5:30
वसतिगृहामधील विद्यार्थ्यास वसतिगृहात जाऊन मारहाण; सात जणांना अटक

दुधा येथे वसतिगृहाच्या विद्यार्थ्यास बेदम मारहाण
धाड(जि. बुलडाणा), दि. २१- मागील भांडणाच्या कारणावरून वसतिगृहामधील एका विद्यार्थ्यास वसतिगृहात जाऊन मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी देणार्या साधारण ८ ते १0 जणांवर धाड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून, याप्रकरणी तक्रारीवरून सात जणांना अटक केली आहे.
बुलडाणा तालुक्यातील दुधा येथील जिजामाता हायस्कूलचे जिजामाता मागासवर्गीय वसतिगृह आहे. या ठिकाणी शालेय मुलांना राहण्याची सोय आहे. या वसतिगृहात राहणार्या विकास विलास इंगळे या विद्यार्थ्यास १९ मार्च रोजी साधारण ११ वाजता माळवंडी ता.बुलडाणा येथील आरोपी पंढरी अरविंद चव्हाण व अधिक ८ ते ९ जण वसतिगृहाच्या मैदानात चारचाकी बोलेरो क्र.एम. एच. २८ यु १९३१८ या वाहनात आले व अधीक्षकांचे कार्यालयाचे बाजूला असणार्या खोलीत प्रवेश करून विकास इंगळे या विद्यार्थ्यास मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार समजताच अधीक्षक बद्रीनारायण भीमराव सोनुने यांनी सदरचा होणारा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही आरोपींनी मारहाण केली व आमच्यामध्ये पडल्यास जीवानिशी मारून टाकू, अशी धमकी दिली. याप्रकरणी अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीवरून धाड पोलिसांनी यामधील आरोपी संदीप सुरडकर, मोहन चव्हाण, विशाल चव्हाण, गणेश डिगोळे, दादाराव कांबळे, शालीग्राम पिंपळे, पंढरी चव्हाण या आरोपींवर कलम ४५२, १४३, १४७, १४८, ३२३, ५0४, ५0६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय आर.टी.शेवाळे यांच्यासह दशरथ शितोळे, एएसआय प्रताप भुतेकर, प्रकाश दराडे, माधव कुटे हे करीत आहेत.