कॅन्सरग्रस्त विवाहितेची जगण्यासाठी धडपड!
By Admin | Updated: July 20, 2014 23:56 IST2014-07-20T23:33:07+5:302014-07-20T23:56:05+5:30
एका २३ वर्षीय विवाहितेला मुळव्याधीचा कॅन्सर आहे. या आजारामुळे तिला असह्य वेदना सहन कराव्या लागतात.

कॅन्सरग्रस्त विवाहितेची जगण्यासाठी धडपड!
खामगाव: तालुक्यातील हिवरखेड येथील एका २३ वर्षीय विवाहितेला मुळव्याधीचा कॅन्सर आहे. या आजारामुळे तिला असह्य वेदना सहन कराव्या लागतात. दोन चिमुकल्यांमध्ये जीव गुंतल्यामुळे तिची जगण्यासाठी धडपड सुरू आहे. मात्र, घरची परिस्थिती हलाखिची सुमारे दीड लक्ष रुपये खर्चांची शस्त्रक्रीया रखडली आहे.
तालुक्यातील हिवरखेड येथील पंढरी राऊत हे शेती करतात. शेती आणि शेतात मजुरीकरून मिळणार्या उत्पन्नातून आई, वडिलांसह पत्नी आणि दोन चिमुकल्यांच्या संसाराचा गाडा ओढतात. पाच-सहा वर्षांपासून सुरळीत संसार सुरू असतानाच गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या संसाराला दृष्ट लागली. त्यांच्या पत्नी वनिता राऊत(२३) यांना मुळव्याधीचा आजार जडला. या आजाराचा त्रास असह्य झाल्यामुळे त्यांनी अकोला येथील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू केले. येथे त्यांच्या प्रकृतीत कोणताही फरक पडत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रीया करण्याचे सुचविले. परंतु, परिस्थिती हलाखिची असल्यामुळे राऊत यांनी पत्नीला संत तुकाराम कॅन्सर रुग्णालय, अकोला येथे हलविले. या रूग्णालयातही उपचारासाठी लाख रुपयांपर्यंत खर्च सांगण्यात आला. या आजारावर त्यांनी सुरूवातीला उपचार केला. मात्र, महिन्याकाठी होणारा खर्च त्यांना झेपेनासा झाला. त्यामुळे त्यांनी पुढील उपचार थांबविले आहेत.
डॉक्टरांनी वनिता यांच्यावर शस्त्रक्रीया करण्याचा सल्ला दिला आहे. त्याकरीता एक ते सव्वा लाख रुपये खर्च अपेक्षित असून पत्नीचा जीव वाचविण्यासाठी पंढरी राऊत केविलवाणी धडपड करीत आहेत. दानदात्यांनी वनिता यांच्या उपचारासाठी मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.