आरोग्य विभागाच्या अजब परीक्षेचा गजब गोंधळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:37 IST2021-09-26T04:37:45+5:302021-09-26T04:37:45+5:30

बुलडाणा : आरोग्य विभागांतर्गत विविध पदांसाठी राज्यभरात २५ आणि २६ सप्टेंबर रोजी परीक्षा घेण्यात येणार होती; परंतु परीक्षेच्या अगोदरच्या ...

Strange confusion of health department's strange exams! | आरोग्य विभागाच्या अजब परीक्षेचा गजब गोंधळ!

आरोग्य विभागाच्या अजब परीक्षेचा गजब गोंधळ!

बुलडाणा : आरोग्य विभागांतर्गत विविध पदांसाठी राज्यभरात २५ आणि २६ सप्टेंबर रोजी परीक्षा घेण्यात येणार होती; परंतु परीक्षेच्या अगोदरच्या दिवशी रात्री उशिरा परीक्षा रद्द करण्यात आल्याने परीक्षार्थींचा गोंधळ उडाला. आरोग्य विभागाच्या अजब परीक्षेच्या गजब गोंधळामुळे परीक्षार्थींमधून रोष व्यक्त होत आहे. आरोग्य विभागातील या मेगाभरतीची प्रतीक्षा उमेदवारांना २०१९ पासून होती. अखेर २६ व २६ सप्टेंबरला आरोग्य विभागातील पदभरतीसाठी परीक्षा घेण्याला मुहूर्त मिळाल्याने उमेदवारांना दिलासा मिळाला होता. त्यामुळे या परीक्षेला उमेदवारांचा प्रतिसादही भरपूर होता; परंतु परीक्षा विभागाकडून वेळेवर परीक्षा रद्द करण्यात आल्याने परीक्षार्थींना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. काही मुले परीक्षा देण्यासाठी दूरपर्यंत गेली होती. त्यांना परत यावे लागले. अनेक जण पैसे खर्च करून परीक्षा देण्यासाठी बाहेरच्या जिल्ह्यात गेले; परंतु परीक्षा रद्द झाल्याने त्यांचे पैसेही गेले आणि मानसिक त्रास झाला तो वेगळाच. आरोग्य विभागाच्या या परीक्षेवरून परीक्षार्थींनी संतप्त प्रतिक्रिया लोकमतकडे व्यक्त केल्या.

मी अमरावतीवरून परत आलो

माझी परीक्षा अमरावती जिल्ह्यातील बडनेर येथील केंद्रावर होती. मी परीक्षेच्या अगोदरच्या दिवशीच आम्ही बुलडाणा येथून निघालो होते; परंतु रात्री ११ वाजता परीक्षा रद्द झाल्याचे कळाले. त्यामुळे अमरावतीतून परत यावे लागले. यात पैसे तर गेलेच शिवाय मानसिक त्रासही झाला.

आसिफ शेख हुसेन, परीक्षार्थी.

राज्य सरकारचा निषेध...

आरोग्य विभागाने भरती प्रक्रिया रात्री ऐन वेळेवर रद्द करून राज्यातील बेरोजगार युवक, युवतींना मानसिक व आर्थिक त्रास दिला. त्यामुळे या सरकारचा आम्ही सर्व उमेदवार निषेध करतो. परीक्षेचे नियोजन यापूर्वीच योग्य पद्धतीने करायला हवे होते.

प्रभाकर वाघमारे, सुशिक्षित बेरोजगार युवक महासंघ, बुलडाणा.

अपघात होऊनही परीक्षेला गेलो...

माझे परीक्षा केंद्र अमरावती येथे होते. मी परीक्षेच्या एक दिवस अगोदरच बसने निघालो होते. त्या बसचा शनिवारी दुपारी बुलडाणा ते खामगाव रोडवर बोथा घाटात अपघात झाला, तरीसुद्धा आपल्याला परीक्षेला जायचेच म्हणून आम्ही सर्वजण घाबरलेल्या अवस्थेत दुसऱ्या बसने अमरावती येथे रात्री १०.३० वाजता पोहचलो; परंतु तिथे गेल्यानंतर रात्री परीक्षा रद्द झाल्याचे कळाले. हा वाईट अनुभव कधीही विसरणार नाही.

ज्ञानेश्वर मुळे

परीक्षा झाली नाही, सोयाबीनही पावसात गेले...

एक विद्यार्थी उसने पैसे घेऊन दोन जिल्ह्यांचा प्रवास करून परीक्षा केंद्रावर पोहोचला होता. बाहेर कुठे राहण्याची सोय नसल्याने त्या विद्यार्थ्याने बसस्थानकावरच रात्र काढली. गावाकडे जास्त पाऊस झाल्याने शेतातील सोयाबीनही वाहून गेले अन् परीक्षाही झाली नाही. आता घरी परीक्षाच झाली नाही, हे कसं सांगावं, असे अनेक प्रसंग या परीक्षेने समोर आले आहेत.

राजकीय पुढाऱ्यांच्या आरोपाच्या फैरी...

परीक्षा रद्दवरून विरोधी पक्षांचे पुढारीही आक्रमक झाल्याचे दिसून आले. शनिवारी रात्री काही बसस्थानकावर मुलांनी रात्रीच गोंधळ घातला. हा महाआघाडीचा महागोंधळ असल्याच्या प्रतिक्रिया लोकप्रतिनिधींनी केल्या.

Web Title: Strange confusion of health department's strange exams!