मोहेगाव येथे सरपंच पदाच्या निवडणुकीवरून दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:33 IST2021-02-12T04:33:08+5:302021-02-12T04:33:08+5:30

तालुक्यातील मोहेगाव येथे गुरुवारी सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक झाली. दरम्यान, सहलीवर गेलेले सहा सदस्य एमएच- २१-सी-२२३१ या ...

Stone throwing from Sarpanch election in Mohegaon | मोहेगाव येथे सरपंच पदाच्या निवडणुकीवरून दगडफेक

मोहेगाव येथे सरपंच पदाच्या निवडणुकीवरून दगडफेक

तालुक्यातील मोहेगाव येथे गुरुवारी सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक झाली. दरम्यान, सहलीवर गेलेले सहा सदस्य एमएच- २१-सी-२२३१ या वाहनातून मोहेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात जात होते. यावेळी मोहेगाव येथे जमावाने त्यांच्या वाहनावर दगडफेक केली. सोबतच गाडीतील ग्रामपंचायत सदस्यांना धक्काबुक्की केली. याच वाहनातील गोविंदा बाप्पू गुळवे (रा. खडकी) यांना काठीने मारहाण करत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी ही देण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, गोविंदा गुळवे यांनी आम्हाला मारहाण करू नका, असे म्हटले असता, आरोपींनी गुळवे यांना काठी व दगडाने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर वाहनाची तोडफोड करून नुकसान करण्यात आले. दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मोहेगाव, खडकी आणि खैरखेड मिळून ही गट ग्रामपंचायत आहे. येथील सदस्य संख्या ११ आहे.

दरम्यान, बंदोबस्तावर असलेल्या बोराखेडी पोलिसांनी ग्रामपंचायत सदस्यांना ग्रा. प. कार्यालयात सुरक्षित पोहोचवले. विशेष म्हणजे यावेळी मोजकेच पोलिस कर्मचारी बंदोबस्तावर होते. त्यामुळे पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. त्यानंतर पोलिसांची अतिरिक्त कुमक बोलावण्यात आली. एसडीपीओ रमेश बरकते व पोलिस अधिकारी आणि कर्मचारी मोहेगाव येथे दाखल झाले. तोपर्यंत बोराखेडीचे पोलिस निरीक्षक माधवराव गरुड, एपीआय राहुल जंजाळ व कर्मचाऱ्यांनी परिस्थिती हाताळली. याप्रकरणी वृत्त लिहिपर्यंत बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. या प्रकरणात प्रसंगी तीन वेगवेगळ्या तक्रारी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Stone throwing from Sarpanch election in Mohegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.