शेतकऱ्यांचे प्रश्न साेडवूनच महामार्गाचे काम सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:08 IST2021-07-13T04:08:27+5:302021-07-13T04:08:27+5:30

मेहकर : समृध्दी महामार्गालगतच्या शेतकऱ्यांचे प्रश्न तात्काळ निकाली निघेपर्यंत महामार्गाचे काम करूच देणार नाही, असा दम आ. ...

Start the work of the highway only after solving the problems of the farmers | शेतकऱ्यांचे प्रश्न साेडवूनच महामार्गाचे काम सुरू करा

शेतकऱ्यांचे प्रश्न साेडवूनच महामार्गाचे काम सुरू करा

मेहकर : समृध्दी महामार्गालगतच्या शेतकऱ्यांचे प्रश्न तात्काळ निकाली निघेपर्यंत महामार्गाचे काम करूच देणार नाही, असा दम आ. डॉ. संजय रायमुलकर यांनी महामार्गाच्या अधिकाऱ्यांना दिला़. रविवारी धानोरा, राजनी, शिवणीपिसा परिसरातील नुकसानग्रस्त शेताची त्यांनी पाहणी केली.

समृध्दी महामार्गाच्या पाण्याचे नियोजन संबंधित ठेकेदाराने वेळेत करून पावसाळ्यापूर्वी या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यायला पाहिजे होती. मात्र तसे न केल्याने शेतकऱ्यांना शेतात ये-जा करणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांनी आम्हास महामार्गाच्या कंपाऊंडला लागून शेतात येण्या-जाण्याकरिता सोडलेल्या रस्त्यामध्ये गिट्टी व मुरूम टाकून द्या, अशी मागणी महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडे केली हाेती़; मात्र अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. यावेळी वादही झाला हाेता़. याप्रकरणी धानोरा-राजनी येथील सरपंच दत्तात्र्य पडघान यांच्यासह सहा शेतकऱ्यांवर विविध कलमांन्वये शनिवारी गुन्हे दाखल करण्यात आल्याने आ. डॉ. संजय रायमुलकर यांनी रविवारी या भागातील समृध्दी मार्गावर पोहोचून संपूर्ण परिसराची पाहणी केली़. यावेळी जि. प. सदस्य दिलीपराव वाघ, पं. स. मा. उपसभापती डॉ . हेमराज लाहोटी, कृउबासं शिव पाटील-तेजनकर, माजी सरपंच सलीमखा पठाण, हनुमंतराव चव्हाण यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते. दरम्यान, लोणार तहसीलचे नायब तहसीलदार हेमंत पाटील, बिट जमादार प्रभाकर सानप, तलाठी संतोष पनाड, पोकॉ.निवृत्ती सानप हजर होते .

शेतरस्ते झाले बंद

समृध्दी महामार्गाचे काम करत असताना लगतच्या शेतजमिनीचा विचार करण्यात आला नसल्याने शेतातील रस्ते बंद झाले. काही शेतकऱ्यांच्या विहिरी गाळल्या गेल्या व शेतात पाणी साचल्यामुळे शेकडो एकर शेती पाण्यात गेल्याने या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली़. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या समस्या आमदार रायमुलकर यांच्याकडे मांडल्या़. समृध्दी महामार्गामुळे बाधित झालेल्या शेतजमिनीची नुकसानभरपाई व इतर प्रश्न निकाली निघेपर्यंत येथील महामार्गाचे काम सुरू करू देऊ नका, नंतर मी बघतो, असा विश्वास आ. रायमुलकर यांनी या शेतकऱ्यांना दिला़.

जमिनीचे पडले तुकडे

समृध्दी महामार्गासाठी शेतकऱ्यांकडून घेण्यात आलेल्या जमिनीतील छोटे-छोटे तुकडे शिल्लक राहिल्यामुळे असे तिथे शेतकरी पीक घेऊ शकत नाहीत. याबाबत शासनाने विचार करून शेतकऱ्यांना लाभ दयावा, तसेच महामार्गाच्या कामासाठी लागणारे बांधकाम साहित्य आणण्यासाठी आजूबाजूच्या गावातील रस्त्याचा वाहतुकीसाठी उपयोग करण्यात आल्याने गावरस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे हे रस्ते पूर्ववत करून देण्यात यावेत, अशी मागणी दिलीपराव वाघ यांनी आ. डॉ . संजय रायमूलकर यांच्या माध्यमातून शासनाकडे केली.

काेट

न्याय्य मागण्या केल्यामुळे आपद्ग्रस्त शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत. अन्यथा समृध्दी महामार्गावर आंदोलन करू - अर्चना दत्तात्रय पडघान, सरपंच धानोरा/राजनी

Web Title: Start the work of the highway only after solving the problems of the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.