आमना नदीतील गाळ काढण्याला सुरुवात
By Admin | Updated: July 31, 2015 23:31 IST2015-07-31T23:31:12+5:302015-07-31T23:31:12+5:30
लोकसहभागातून आमना नदीचे खोलीकरणासाठी गाळ काढणे व रुंदीकरणाच्या कामाची सुरुवात; जलपातळीत होणार वाढ.

आमना नदीतील गाळ काढण्याला सुरुवात
देऊळगावराजा (बुलडाणा): लोकसहभागातून शहरातील आमना नदीचे खोलीकरणासाठी गाळ काढणे व रुंदीकरणाच्या कामाची सुरुवात अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनात ३१ जुलै रोजी करण्यात आली. नदीच्या सौंदर्यकरण या अभिनव उपक्रमाने शेतकर्यांना आणि शहरवासीयांना फायदा होणार आहे. त्यामुळे यात नागरिकांनी सहभाग नोंदवून सहकार्य करावे तसेच शेतकर्यांनी नदीतील गाळांचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी अप्पर जिल्हाधिकारी टाकसाळे यांनी केले. गेल्या किती वर्षापासुन शहरातील आमना नदीचा अस्तित्व हरवून गेला होता. महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातून ३१ जुलै रोजी आमना नदीतून गाळ उपसा करण्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळ, उपविभगीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाड, तहसीलदार शंकर बुटले, तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड, मुख्याधिकारी अनिल अढागळे, माजी उपजिल्हाधिकारी रमेश कायंदे, नगराध्यक्षा सौ.मालतीताई कायंदे, उपाध्यक्ष सै.करीम, नगरसेवक नंदन खेडेकर, मुरलीधर कांबळे, विष्णु रामणे आदी उपस्थित होते. लोकसहभागातून सुरु झालेल्या या अभियानास शेतकर्यांनी आणि नागरिकांनी पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद देत ट्रॅकटरने गाळ नेण्यास सुरुवात केली होती. हा गाळ शेतकर्यांना विनामुल्य दिला जातो आहे. आमना नदीतील गाळामध्ये सँड, सिल्ट आणि क्ले असे तीन घटक या गाळात जास्त प्रमाणात असल्याने पिकांसाठी हा गाळ संजीवनी ठरणार आहे. यामुळे जमिनीतील सुपीकता वाढुन पोत चांगली होते. यात बी बियाण्यास प्रतिसाद मिळतो आणि यामुळेच उत्पादन क्षमता वाढते व शेतकर्याला फायदा होतो. त्यामुळे या गाळाचा लाभ घेण्याचे आवाहन शेतकर्यांना करण्यात आले. यावेळी शहरातील नागरिक, पत्रकार, विविध पक्षाच्या पदाधिकारी, न.प.कर्मचारी, तहसील कर्मचारी आदि उपस्थिीत होते.