एसटीचे २0 शेड्युल रद्द
By Admin | Updated: November 8, 2014 23:50 IST2014-11-08T23:50:15+5:302014-11-08T23:50:15+5:30
मेहकर, जळगाव पाठोपाठ बुलडाण्यातही डिझेलचा तुटवडा : बसेस थांबल्या.

एसटीचे २0 शेड्युल रद्द
बुलडाणा : मेहकर व जळगाव जामोद पाठोपाठ राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा डेपोतील डिझेल संपल्यामुळे शनिवारी एसटीचे २0 शेड्युल रद्द झाले. त्यामुळे शेकडो प्रवासी दिवसभर बसस्थानकावर अडकून पडले होते. सायंकाळी डिझेलचा टँकर आल्यानंतर एसटी बसेस सुरू झाल्या. परिणामी, बसस्थानकावर प्रवाशांनी एकच झुंबड केली होती. राज्य परिवहन महामंडळ यापूर्वी खासगी डिझेल पंपावरून डिझेल खरेदी करीत होते. आता पुन्हा एसटीचे स्वत:चे डिझेल पंप सुरू झाल्यापासून एसटीला आता डेपोमध्येच डिझेल मिळू लागले आहे; मात्र दोन दिवसापासून बुलडाणा विभागात एसटीला डिझेलचा तुटवडा पडू लागल्याने एसटी बसेस दिवसभर उभ्या राहण्याचे प्रकार घडू लागले आहेत. मेहकर डेपोमध्ये शुक्रवार, ७ नोव्हेंबर रोजी डिझेलअभावी ४0 शेड्युल रद्द झाले होते. याच दिवशी जळगाव जा.डेपोमध्येसुद्धा डिझेल संपल्याने अनेक शेड्युल बंद करावे लागले होते. आज हाच प्रकार बुलडाणा डेपोमध्ये घडला. सकाळी ११ वाजता बुलडाणा डेपोमधील डिझेल संपल्यामुळे जवळपास २0 शेड्युल बंद ठेवावे लागले. त्यामुळे सकाळपासून बाहेरगावी जाणार्या प्रवाशांना दिवसभर बसस्थानकावरच ताटकाळत रहावे लागले. चौकशी कक्षात दिवसभर प्रवाशी चौकशी करीत होते पण प्रवाशांना खरी माहिती मिळत नव्हती. अखेर सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्लॅटफॉर्मवर एकही बस लागत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रवाशांचा बांध फुटला व प्रवाशांनी एकच हल्लाबोल केला. अखेर सायंकाळी डिझेलचा टँकर आल्यानंतर एसटी बसेस सोडण्यात आल्या; मात्र तोपर्यंत बसस्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती.