उघड्यावर फेकला औषधी साठा; आठ महिन्यांतील दुसरी घटना
By Admin | Updated: May 19, 2017 00:22 IST2017-05-19T00:22:18+5:302017-05-19T00:22:18+5:30
सुलतानपूर : नजिकच्या बोरखेडी शिवारात १८ मे रोजी गुरुवारी बेवारसरीत्या शेकडो औषध-गोळ्यांचा साठा बोरखेडी पुलाखाली आढळला.

उघड्यावर फेकला औषधी साठा; आठ महिन्यांतील दुसरी घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
सुलतानपूर : विविध आजारांच्या रुग्णांना देण्यात येणारा सरकारी दवाखान्यातील औषध साठ्याचा तुटवडा असल्याचा कांगावा आरोग्य विभागाकडून नेहमीच करण्यात येतो. मात्र, सुलतानपूर नजिकच्या बोरखेडी शिवारात १८ मे रोजी गुरुवारी बेवारसरीत्या शेकडो औषध-गोळ्यांचा साठा बोरखेडी पुलाखाली आढळला.
मुदतबाह्य झाल्याचे कारण पुढे करीत फेकून देण्यात आलेल्या या औषधीमुळे आरोग्य विभागाचा बेफिकीरपणा समोर आला असून, मागील आठ महिन्यांतील ही दुसरी घटना असल्याने याबाबत आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ताप, डायरिया व साथीच्या आजाराने खेडेपाडे हैराण आहेत. सुलतानपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळणारी अपुरी व अनियमित सेवा याची नेहमीच वानवा असते. त्यामुळे रुग्णांना नेहमीच खासगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागत आहेत. आज उघड्यावर बेवारसपणे सापडलेल्या औषधीमध्ये अँटीबायोटिक, वेदनाशामक व अॅलर्जीसाठी वापरण्यात येणारा औषधी साठा आढळून आला. याबाबतची माहिती सुलतानपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे औषध निर्माण अधिकारी व्ही.के. तेजनकर यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला.