औषध विक्रेत्यांच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
By Admin | Updated: October 15, 2015 00:36 IST2015-10-15T00:36:43+5:302015-10-15T00:36:43+5:30
ऑन लाइन औषधविक्रीच्या विरोधात औषधी विक्रेता संघटनेचा बंद.

औषध विक्रेत्यांच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
बुलडाणा : इंटरनेट, ई-फार्मसीच्या माध्यमातून देशात व राज्यात सुरू असलेली बेकायदेशीर ऑनलाइन औषधविक्रीला विरोध म्हणून अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी पुकारलेल्या देशव्यापी बंदला जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. राज्यात सुमारे ५५ हजार, तर जिल्ह्यात ११00 औषध दुकाने कडकडीत बंद होते. त्यामुळे या बंदला जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शासनाने औषध विक्रेत्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण करणारी ऑनलाइन औषध विक्री त्वरीत थांबवावी, १00 वर्षापेक्षा जास्त काळापासून औषध वितरण व्यवस्था सांभाळण्यात मोठय़ा प्रमाणावर योगदान देणार्या देशातील आठ लाख औषध विक्रेते व त्यांच्यावर अवलंबून असणारे ४0 लाख कर्मचारी यांच्या भवितव्याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी औषध विक्रेत्यांची होती. या मागणीसाठी बुलडाणा जिल्ह्यातील सुमारे ११00 औषध विक्रेत्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविला. जिल्ह्यातील सर्वच औषध दुकाने बंद असल्यामुळे रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. रुग्णांची तपासणी झाल्यानंतर औषध दुकान बंद असल्यामुळे रुग्ण, त्यांच्या नातेवाइकांना मनस्ताप झाला.