संत कबिरांसाठी सर्वधर्मियांचा गोतावळा
By Admin | Updated: September 2, 2015 02:25 IST2015-09-02T02:25:20+5:302015-09-02T02:25:20+5:30
एकात्मतेचे दर्शन करून देणारी भंडा-यांची परंपरा जपतात अंत्री देशमुखवासी.

संत कबिरांसाठी सर्वधर्मियांचा गोतावळा
ब्रम्हानंद जाधव / मेहकर : तालुक्यातील अंत्री देशमुख येथे पवित्र श्रावण महिन्याच्या तिसर्या सोमवारला संत कबिरस्वामींचा भंडारा करण्याची परंपरा पिढय़ान-पिढय़ापासून चालू आहे. श्रावण सोमवार, ३१ ऑगस्ट रोजी अंत्री देशमुख येथे संत कबिरस्वामींचा भंडारा पार पडला. या भंडार्यासाठी पंचक्रोशीतील सर्वधर्मियांचा गोतावळा जमला होता. संत कबिरस्वामींची महती आजही त्यांच्या दोह्यातून जिवंत ठेवण्याचे कार्य अंत्री देशमुखवासी करीत असून, सर्व धर्मियांमिळून साजरा केला जाणारा हा उत्सव एकात्मतेचे दर्शन घडवितो.
हद चलै सो मानवा, बेहद चलै सौ साध। हद बेहद दोऊ तजै, ताकर मधा अगाध । जो चाकोरीत राहून जगतो तो सामान्य माणूस होय. जो रूढी, बंधने झुगारून चाकोरीबाहेरचे जिणे जगतो तो साधू होय; पण जो चाकोरीतील आणि चाकोरीबाहेरील दोन्ही प्रकारचे जीवन सोडून देतो त्याचेच मन खर्या अर्थाने अगाध असते, व्यापक असते. या सारख्या अनेक दोह्यांमधून अनिष्ट रूढी, परंपरांवर कठोर प्रहार करून जनतेचे मत परिवर्तन करणारे संत कबिर पंधराव्या शतकात होऊन गेले. संत कबिराची नाळ महाराष्ट्रातील संतांशी जुळत गेली. भारतासह महाराष्ट्रात संत कबिर मंदिर बोटावर मोजण्याइतकी असून, मेहकर तालुक्यातील अंत्री देशमुख या खेड्यात शेकडो वर्षांपूर्वीचे संत कबिर मंदिर आहे. दरवर्षी गावातील सर्व धर्मियांमिळून वर्गणी जमा करतात. या वर्गणीतून श्रावण महिन्यात तिसर्या सोमवारी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या भंडार्याचे वैशिष्ट्य म्हणजे महाप्रसाद केवळ पुरूष मंडळीच तयार करतात. यात पुरी, गव्हाच्या भरड्याचा शिरा, कढी, भात हे पदार्थ असतात.
सर्वधर्मियांचे लोक करतात संत कबिरांचे पूजन
मेहकर तालुक्यातील अंत्री देशमुख येथे सर्वधर्मियांचे लोक केवळ भंडार्यातच एकत्र येत नाहीत; तर प्रत्येक सण-उत्सवाच्या दरम्यान सर्वधर्मियांचे व्यक्ती संत कबिरांचे पूजन करतात; तसेच भंडार्यात संत कबिरांचे दर्शन घेऊन त्यांचे दोहे गायले जातात. यावेळी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंंत सर्वच जण भंडार्याचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी झटतात.