सोयाबीनचा पेरा वाढणार; कापसात घट!
By Admin | Updated: April 29, 2016 02:08 IST2016-04-29T02:08:19+5:302016-04-29T02:08:19+5:30
बुलडाणा जिल्ह्याचे खरिपाचे शंभर टक्के उद्दिष्ट; ७ लाख ४९ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन.

सोयाबीनचा पेरा वाढणार; कापसात घट!
बुलडाणा: यावर्षी पावसाचे प्रमाण हे भरपूर असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असल्याने जिल्ह्यातील बहुतांश शेतकर्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे वेगाने सुरू केली आहेत. जिल्ह्यात खरीप पेरणीचे एकूण सरासरी क्षेत्र ७.४८ लाख हेक्टर आहे. यंदा खरिपाची शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती ठेवत यात ७.४९ लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरणीचे नियोजन कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाने केले आहे. विशेष म्हणजे गतवर्षी २ लाख १ हजार ३२१ हेक्टरवर कापसाचे नियोजन होते. या पेरणी क्षेत्रात यंदा ४0 टक्के घट करण्यात आली असून, १ लाख ६१ हजार हेक्टरवर कापसाचे नियोजन आहे. तर सोयाबीनच्या पेर्यात यंदाही वाढ झाली आहे. गतवर्षी सोयाबीन आणि कापसाच्या निर्धारित केलेल्या क्षेत्रामध्ये सरासरी उत्पादकता कमी आली होती. शिवाय अवकाळी पावसामुळे पिकांचे जास्त नुकसान झाल्यामुळे बर्यांच पिकांमध्ये यंदा घट होण्याची शक्यता कृषी विभागला होती. यात सर्वाधिक फटका कापूस उत्पादन शेतकर्यांना बसला, यानंतर जेमतेम निघालेल्या कापसला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकर्यांची निराशा झाली. त्याचाच परिणार यंत्राच्या खरीप हंगाम नियोजनावर आढळून आला. खरिपाच्या पेरणीसाठी यंदाही शेतकर्यांनी सोयाबीनच्या पेरणीलाचा जास्त पसंती दर्शविली. बुलडाणा जिल्ह्यात खरीप पेरणीसाठी प्रभावित क्षेत्र ७ लाख ४९ हजार ८९३ हेक्टर एवढे आहे. यात यावर्षी ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, सूर्यफूल, तीळ, ऊस, सोयाबीन, कापूस आदी पिकांचे कृषी विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे.