सोयाबीनचा पेरा वाढणार, कापूस घटणार
By Admin | Updated: May 6, 2015 00:33 IST2015-05-06T00:33:39+5:302015-05-06T00:33:39+5:30
बुलडाणा जिल्हात खरीप हंगामासाठी ७ लाख ४२ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन.

सोयाबीनचा पेरा वाढणार, कापूस घटणार
बुलडाणा : जिल्ह्यात खरीप पेरणीचे एकूण सरासरी क्षेत्र ७.४८ लाख हेक्टर आहे. यात ७.४२ लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरणीचे नियोजन कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाने केले आहे. यंदा ९८ टक्के खरिपाची पेरणी होण्याची शक्यता आहे. यात गत वर्षाच्या तुलनेत सोयाबीनच्या पेर्यात वाढ, तर कापसाचा पेरा घटण्याची शक्यता आहे. गतवर्षी सोयाबीन आणि कापसाच्या निर्धारित केलेल्या क्षेत्रमध्ये सरासरी उत्पादकता कमी आली होती. शिवाय अवकाळी पावसामुळे पिकांचे जास्त नुकसान झाल्यामुळे बर्यांच पिकांमध्ये यंदा घट होण्याची शक्यता कृषी विभागला होती; मात्र खरिपाच्या पेरणीसाठी यंदाही शेतकर्यांने कापूस आणि सोयाबीनच्या पेरणीलाच जास्त पसंती दर्शविली. बुलडाणा जिल्ह्यात खरीप पेरणीसाठी प्रभावित क्षेत्र ७ लाख ४२ हजार ८९३ हेक्टर एवढे आहे. यात यावर्षी ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, सूर्यफूल, तीळ, ऊस, सोयाबीन, कापूस आदी पिकांचे कृषी विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. २ मे रोजी कृषी मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत या कृषी नियोजनाला संमती देण्यात आली. जिल्ह्यातील १३ तालुक्यात गत वर्षी सोयाबीनची पेरणी २६६९२९ हेक्टर क्षेत्रात करण्यात आली होती. यावर्षी सोयाबीन पेरणीसाठी ३ लाख ४४ हजार ९६0 हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे पेरणी क्षेत्र जास्त आहे. तूर, मूग, उडीद आणि इतर कडधान्यासाठी पिकांसाठी एकून १ लाख २१ हजार ८६८ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे.