शेतकर्यांनी मांडल्या व्यथा
By Admin | Updated: May 26, 2015 02:13 IST2015-05-26T02:13:31+5:302015-05-26T02:13:31+5:30
लोणार येथे आम आदमी पक्षाची शेतकरी, शेतमजूर संवाद यात्रा.

शेतकर्यांनी मांडल्या व्यथा
लोणार : गारपीट, अतवृष्टी व सततच्या नापिकीला कंटाळून विदर्भातील शेतकर्यांनी पत्कारलेला आत्महत्येचा मार्ग सोडण्यासाठी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांंंनी २३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता स्थानिक बसस्थानक परिसरात शेतकरी, शेतमजूर संवाद यात्रेदरम्यान शेकडो शेतकर्यांशी संवाद साधला. आपच्या शेतकरी, शेतमजूर संवाद यात्रेचे २३ मे रोजी सायंकाळी ५ वाजता तालुक्यात आगमन झाले होते. दरम्यान, आपच्या कार्यकर्त्यांंंनी गारपीट, अवकाळी पावसाचा फटका बसल्याने प्रचंड नुकसान झालेल्या वडगावतेजन, शारा, सुलतानपूर, किन्ही, बिबखेड, धायफळ, किनगावजट्ट येथील शेतकर्यांशी संवाद साधून शेतकर्यांची परिस्थिती जाणून घेतली. सायंकाळी ६ वाजता दरम्यान १0 ते १२ वाहनांच्या ताफ्यासह आपची शेतकरी, शेतमजूर संवाद यात्रा लोणार शहरात दाखल झाली. त्यानंतर स्थानिक बसस्थानक परिसरात दीड तास शहरातील शेकडो शेतकर्यांशी संवाद साधून आत्महत्या न करण्याचे आवाहन डॉ.प्रतिमा व्यवहारे, सुनील मोरे, प्रशांत मोरे, शाहिना पठाण यांनी केले. याप्रसंगी शेतकर्यांनी आपच्या कार्यकर्त्यासमोर आपल्या व्यथा मांडतांना सांगितले की, शेतीमालाला योग्य हमीभाव मिळत नाही. पेरणीसाठी पीक कर्जाचे पुनर्गठण होत नाही. शेतीला पाणी, वीज मुबलक प्रमाणात मिळत नाही, शेती व्यवसाय तोट्यात गेल्याने दोन वर्षांपासून पिकांचे उत्पादन झाले नाही. लागवडीचा खर्चही वसूल न झाल्याने शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. शासनाने संपूर्ण कर्जमाफीचे गाजर दाखवून शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला असल्याने शेतकर्यांनी कंटाळून आत्महत्येचा मार्ग पत्कारला आहे.