सर्पदंश ही नैसर्गिक आपत्ती ठरावी

By Admin | Updated: July 31, 2014 01:29 IST2014-07-31T00:43:04+5:302014-07-31T01:29:08+5:30

बुलडाणा जिल्ह्यात पाच वर्षांमध्ये ३७ मृत्युची नोंद : १ हजार ४३५ घटनांमध्ये लोकांना झाला सर्पदंश.

The snakebite is a natural disaster | सर्पदंश ही नैसर्गिक आपत्ती ठरावी

सर्पदंश ही नैसर्गिक आपत्ती ठरावी

नीलेश शहाकार / बुलडाणा
मानवी वस्त्यांमध्ये वावरणारे साप आता लोकांसाठी मृत्यूचा सापळा बनले आहेत. गेल्या पाच वर्षांत अमरावती विभागातील २४८ जणांचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यात हा आकडा ३७ एवढा मोठा आहे; मात्र वन्यजीव संरक्षण कायद्यात सर्पदंशाने मृत्यू झालेल्यांना अर्थसाहाय्य देण्याची तरतूद नसल्याने ही कुटुंबे आर्थिक अडचणीत आहे.
वन्यजीव संरक्षण कायद्यात वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तडस, कोल्हा व रानकुत्रे यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या किंवा मृत्युमुखी पडलेल्यांना अर्थसाहाय्य देण्याची तरतूद करण्यात आली आहे. सर्पदंशच्या मृत्यूसाठी कोणतीही आर्थिक तरतूद नसल्यामुळे जिल्ह्यातील ३७ कुटुंबीयांना शासनाच्या कोणत्याही मदतीशिवाय जगावे लागत आहे.
गत पाच वर्षांत अमरावती विभागातील अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ आणि बुलडाणा या पाच जिल्ह्यात ११ हजार १0७ घटनांमध्ये लोकांना सर्पदंश झाला. यात २४८ जणांचा मृत्यू झाला. पाचही जिल्ह्यांतील पाच वर्षांत सर्पदंशाने मृत्यू झालेल्यांची आकडेवारी थक्क करणारी आहे. सर्पदंशाने मृत्युमुखी पडणार्‍यांमध्ये बहुतांश शेतकरी, शेतमजुरांचा समावेश असतो; मात्र सर्पदंशामुळे झालेल्या मृत्यूला कोणतीही भरपाई देण्यास वन विभागाने हात आखडता घेतला आहे. साप जरी वन्यप्राणी असला तरी सर्पदंशामुळे बरेच मृत्यू होतात, कोणाला मदत द्यायची, याचे नियोजन नाही, असे कारण सांगत वन्यजीव मंडळाने सर्पदंश मृत्यूच्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव फेटाळला. सर्पदंशमुळे मृत्युमुखी पडणार्‍यांना आर्थिक सहाय्य देण्याबाबत प्रश्न गेल्या सात-आठ वर्षापासून शासन दरबारी विचाराधिन आहे; मात्र याबाबत अद्यापही कुठलाही निर्णय झाला नाही. भविष्यामध्ये शासनाकडून सकारात्मक निर्णय येण्याची शक्यता आहे, असे बुलडाण्याचे तहसीलदार दिनेश गीते यांनी सांगीतले.

*बुलडाणा जिल्ह्यात ३७ मृत्युची नोंद
जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रासह एक जिल्हा सामान्य रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालय व १२ ग्रामीण रुग्णालय असे १५ रुग्णालय कार्यरत आहे. जिल्ह्यभरात कार्यरत या पंधरा रुग्णालयात सन २0१0 ते २0१४ या पाच वर्षाच्या काळात १ हजार ४३५ सर्पदंशाचे रुग्ण दाखल झाले आहेत. त्यापैकी ३७ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यातही ग्रामीण भागातील सर्पदंशाचा आकडा मोठा आहे.

Web Title: The snakebite is a natural disaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.