दुर्गम गावांसाठी सर्प प्रतिविष किट्स !
By Admin | Updated: January 28, 2015 00:05 IST2015-01-28T00:05:58+5:302015-01-28T00:05:58+5:30
वनविभाग घेणार दखल ; वारंवार सर्पदंशाच्या घटना घडणा-या गावांचा समावेश.

दुर्गम गावांसाठी सर्प प्रतिविष किट्स !
जयदेव वानखडे / जळगाव जामोद (बुलडाणा):
वनपरिक्षेत्रांतर्गत तथा इतर दुर्गम भागामध्ये ज्याठिकाणी सर्पदंशाच्या घटना वारंवार घडतात आणि लवकर औषधोपचार मिळत नाही. दवाखाना गावापासून खूप लांबच्या अंतरावर आहे, अशा गावातील जनतेचे आरोग्य धोक्यात असते. अशा दुर्गम ठिकाणी एखाद्या व्यक्तीला सर्पदंश झाला तर केवळ लवकर उपचार मिळाला नाही म्हणून त्या रूग्णाला प्राणास मुकावे लागते. अशा गावातील जनतेची दखल आता वनविभागाने घ्यायची ठरवले असून, त्या गावामध्ये सर्प प्रतिविष किट्स मागणीचे प्रस्ताव उपवनसंरक्षक वनविभाग बुलडाणा यांच्याकडून मागविण्यात आले आहेत.
ज्या गावामध्ये सर्पदंशाच्या घटनेने लोक मृत्युमुखी पडले आहेत आणि जी गावे दुर्गम क्षेत्रात आहेत अशा गावांमध्ये वनविभागाच्यावतीने सर्प प्रतिविष किड्स ठेवण्यात येणार आहेत. याबाबत गावातील समाजसेवी व्यक्तींना प्रशिक्षण देऊन संकटाचे वेळी त्याचा वापर कसा करायचा, याचे प्रात्यक्षिक दिले जाणार आहे, त्यामुळे सर्पदंशाने, वेळेवर उपचाराअभावी मृत्यू येणार्यांची संख्या निश्चितच घटेल.
तालुक्यातील दुर्गम क्षेत्र व सर्पदंशाच्या घटना ज्या गावात घडल्या अशा भिंगारा, कुवरदेव, गोमाल, सोनबर्डी, हनवतखेड, रायपूर, खेर्डा, पळशी सुपो, धानोरा, इस्लाम पूर, सावरगाव, आडोळ इत्यादी गावांसह जळगाव, संग्रामपूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये या किट्स ठेवण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे ठरविण्यात आले.
*आदिवासी परिसरात विषारी साप अधिक प्रमाणात आढळतात. आतापर्यंंत उपचाराअभावी अनेकांना आपले प्राण गमावावे लागले. नाग आणि मण्यार या विषारी सर्पांंच्या जाती येथे आढळतात. तर फुरसे तुरळक प्रमाणात दिसतो. घोणस अद्याप परिसरात आढळला नाही.