सागवान वृक्षाला तस्करीची कीड
By Admin | Updated: April 17, 2017 00:53 IST2017-04-17T00:53:38+5:302017-04-17T00:53:38+5:30
बुलडाणा- सागवन वृक्षाला लाकूड तस्करीची कीड लागली असून, एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या एका वर्षात विदर्भातील पाच वनक्षेत्रात ७,२०२ सागवृक्षांची कत्तल केल्याची माहिती वन विभागाकडून प्राप्त झाली आहे

सागवान वृक्षाला तस्करीची कीड
विदर्भात अवैध वृक्षतोड वाढली : वर्षभरात ७ हजार साग वृक्षांची कत्तल
बुलडाणा: वनराईवर अवैध वृक्षतोड करणाऱ्यांची वक्रदृष्टी पडली आणि मोठ्या प्रमाणात वृक्षतोड वाढली. यात मौल्यवान समजल्या जाणाऱ्या सागवन वृक्षाला लाकूड तस्करीची कीड लागली असून, एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या एका वर्षात विदर्भातील पाच वनक्षेत्रात ७,२०२ सागवृक्षांची कत्तल केल्याची माहिती वन विभागाकडून प्राप्त झाली आहे.
सागवान लाकडाला सोन्याचा भाव आल्याने जंगलातील या झाडांची कत्तल होण्याचे प्रमाणही वाढले आहे. कधी रात्रीच्या वेळी तर कधी दिवसाढवळ्या राजरोसपणे ही वृक्षतोड केली जात आहे. पण या अवैध वृक्षतोडीकडे सोईस्कर की अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे शहर आणि परिसरात सॉ मिलवर व फर्निचर दुकानात काळ्या बाजारातील लाकडाची खरेदी केली जाते.
वनसंपदेचे संरक्षण करण्यासाठी वन अधिकारी, वनरक्षकासह आदी कर्मचारी वनक्षेत्राची नियमित गस्त, आरागिरण्यांची तपासणी आणि तपासणी नाक्याद्वारे वाहनांची तपासणी इत्यादी करीत असतात. तरीदेखील एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या एक वर्षाच्या काळात विविध प्रजातीच्या ३० हजार ३६२ वृक्षांची अवैधरीत्या कत्तल करण्यात आली. यात ७२०२ सागवृक्षांचा समावेश आहे.
राज्यात वृक्षतोड वाढली!
गत तीन वर्षाच्या काळात विविध वनपरिक्षेत्रामध्ये वृक्षांची अवैध वृक्षतोड झाल्याच्या घटना वाढल्या आहे. २०१४-१५ मध्ये १ लाख १९ हजार ८६७ वृक्षांची अवैधरीत्या तोड करण्यात आली. तर २०१५-१६ मध्ये हा आकडा १ लाख २६ हजार १३७ वर पोहचला.तर २०१६-१७ यात भर पडून तब्बल १ लाख ३९ हजार ५८६ वृक्षांची अवैधरीत्या तोड करण्यात आली. यात १ लाख ७५ हजार ३३९ सागवृक्ष आहे.
८२ हल्ले आणि २५९ जखमी
वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी कार्यतत्पर असणाऱ्या वनाधिकारी व कर्मचाऱ्यांवर लाकूड तस्करांकडून २०१४ ते २०१७ या वर्षादरम्यान ८२ हल्ले करण्यात आले. यात २५९ वनकर्मचारी जखमी झाले. या प्रकरणी वन विभागाच्या तक्रारीवरून वनगुन्हे दाखल करण्यात आले आहे.