तुरीचे मोजमाप संथ गतीने!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2017 00:04 IST2017-04-21T00:04:07+5:302017-04-21T00:04:07+5:30
खामगाव- वाढलेल्या आवकमुळे बारदान्याची टंचाई नाफेड केंद्रावर निर्माण होत आहे. परिणामी मोजमाप मंदावले असून, ऐन लग्नसराईतही शेतकऱ्यांना या केंद्रांवर मुक्काम वाढत आहे.

तुरीचे मोजमाप संथ गतीने!
खामगाव येथील नाफेड केंद्रावर बारदान्याची टंचाई
खामगाव: हमीदराने तूर खरेदी केंद्रावर १५ एप्रिलपासून आवक जवळपास बंद करण्यात आली आहे; मात्र वाढलेल्या आवकमुळे बारदान्याची टंचाई या केंद्रांवर निर्माण होत आहे. परिणामी मोजमाप मंदावले असून, ऐन लग्नसराईतही शेतकऱ्यांना या केंद्रांवर मुक्काम वाढत आहे.
जिल्ह्यात यावर्षी १३ ठिकाणी ५ हजार ५० रुपये प्रतिक्विंटल या दराने तूर खरेदी करण्यात येत आहे; मात्र मागील वर्षी तीन आकडी भाव असणाऱ्या तुरीला यावर्षी निम्मासुद्धा भाव नाही. शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्याने गतवर्षी ज्या शेतमालाचे भाव वाढतात त्या पिकाचे उत्पादन शेतकरी भाववाढीच्या आशेने घेतात; मात्र आयात व इतर कारणांमुळे अशा शेतमालाचे भाव पडतात. अशीच शेतकऱ्यांची निराशा यावर्षी तुरीच्या पिकाने केली आहे. परिणामी कधी नव्हे तेवढी आवक हमीदर तूर विक्री केंद्रावर झाली आहे. परिमाणी अनेक शेतकरी महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून हमीदर केंद्रावर मुक्काम ठोकून आहेत. खामगाव येथील केंद्रावर अद्यापही सुमारे ३० हजार क्ंिवटल तुरीचे मोजमाप होण्याच्या प्रतीक्षेत्र आहे. मलकापूर येथील केंद्रावरही २५ हजार क्विंटल तुरीचा वजनकाटा होणे बाकी आहे. नांदुरा येथील केंद्रावर हमालांनी संप पुकारल्याने तुरीचे मोजमाप रखडले होते; मात्र आता तूर मोजणी सुरू झाली असली तरी येथेसुद्धा आलेल्या तुरीचे मोजमाप होण्यास अजूनही किमान १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. शेगाव येथील केंद्रावरसुद्धा आतापर्यंत बारदान्याचा अभाव, व्यापाऱ्यांच्या तूर खरेदीचे आरोप यामुळे तुरीचे मोजमाप संथगतीने सुरू असल्याने येथील केंद्रावरही अद्याप तूर पडून आहे. यावर्षी जिल्हाभरात तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने व भाव पडल्याने नाफेडच्या केंद्रावर लाखो क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. मात्र एकूणच वाढलेली तुरीची आवक पाहता केंद्रावर विविध समस्या उदभवत असल्याने शेतकऱ्यांना यावर्षी या केंद्रावर अनेक दिवस मुक्काम करावा लागला.