ऊस जळाल्याने सहा लाखांचे नुकसान
By Admin | Updated: November 25, 2015 02:06 IST2015-11-25T02:06:37+5:302015-11-25T02:06:37+5:30
मेहकर तालुक्यातील घटना, ठिबक सिंचन साहित्यही भस्मसात.

ऊस जळाल्याने सहा लाखांचे नुकसान
मेहकर (जि. बुलडाणा) : जानेफळ रोडवरील गट नं.३४/१ शिवारातील ५ एकर शेतातील ऊस व शेतात असलेले ठिबक सिंचन साहित्य जळाल्याने ६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना २४ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. येथील मदनलाल सीताराम मोदाणी यांचे जानेफळ रोडवरील गट नं.३४/१ शिवारात शेत आहे. त्यांनी आपल्या ५ एकर शेतामध्ये ऊस लावला होता. त्यांच्या उसाच्या शेतामधून महावितरणच्या विद्युत तारा गेलेल्या आहेत. दरम्यान, २४ नोव्हेंबरला अचानक महावितरणच्या विद्युत तारांमध्ये शॉक सर्किट होऊन उसाला आग लागली. यामध्ये संपूर्ण उस जळून खाक झाला. तसेच शेतातील ठिबक सिंचनाचे साहित्यही जळाले. यामध्ये मदनलाल मोदाणी यांचे एकूण ६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यावेळी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने व खासगी टँकरने आग आटोक्यात आणली. मागील वर्षीही ऊस जळाल्याने मदनलाल मोदाणी यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. मदनलाल मोदाणी हे शेतातून गेलेल्या विद्युत तारा हटविण्याची महावितरणकडे गत तीन वर्षांपासून मागणी करीत आहेत; परंतु विद्युत तारा हटविण्यात येत नसल्याने मोदाणी यांचे दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.