Six Directors of Khamgaon Bazar Samiti to be axed | खामगाव बाजार समितीच्या सहा संचालकांवर गंडांतर!

खामगाव बाजार समितीच्या सहा संचालकांवर गंडांतर!

- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभांना सतत गैरहजर राहणाऱ्या सहा संचालकांच्या पदावर लवकरच गंडातर येणार असल्याचे संकेत आहेत. बाजार समितीच्या संचालकांच्या सतत गैरहजर प्रकरणी विशेष लेखा परिक्षकांच्या चौकशी अहवालानुसार तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधकांनी खामगाव कृउबास सभापती, सचिवांना २४ फेब्रुवारी रोजी दिले आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत एकच खळबळ उडाली आहे.
खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील अनियमितता आणि कृउबास संचालक सभांना सतत गैरहजर प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते नंदलाल भट्टड यांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे तक्रार नोंदविली. या तक्रारीच्या अनुषगांने डी.पी.जाधव, विशेष लेखापरीक्षक वर्ग-२, सहकारी संस्था, (पणन) बुलडाणा यांनी त्यांचा चौकशी अहवाल दि.१९.०८.२०१९ रोजी या कार्यालयाकडे सादर केला. दरम्यान, त्यावेळी बाजार समितीचे संचालक सतत सभांना गैरहजर असल्याबाबत या मुद्यावर बाजार समितीचे संचालक मंडळ यांवर महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (विकास व नियमन) अधिनियम १९६३ चे कलम ४५ अन्वये कार्यवाही झाल्यामुळे या मुद्याबाबत कार्यवाही करावयाची आवश्यकता नसल्याबाबत कळविण्यात आले होते. दरम्यान, तक्रारदार नंदलाल भट्टड यांनी या कार्यालयाकडे दि.०६.०२.२०२० रोजी तक्रार अर्ज करुन आपल्या बाजार समितीचे संचालक प्र.भ.टिकार, वि.भा.लोखंडकार, विवेक मोहता, संजय झुनझुनवाला, आर.एस.हेलोडे व एस.एन.टिकार हे सतत तीन सभांना गैरहजर असल्याकारणाने कलम २४ नुसार कार्यवाही करुन सदर संचालकांना पदापासुन निलंबीत करणेबाबत कार्यवाही करावी अशी मागणी केलेली आहे.
त्यामुळे चौकशी अहवालातील निष्कषार्नुसार व महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (विकास व नियमन) अधिनियम १९६३ चे कलम २४ मधील तरतुदीनुसार आवश्यक प्रस्ताव तात्काळ या कार्यालयाकडे आवश्यक कार्यवाहीकरीता जिल्हा उपनिबंधकांनी तात्काळ चौकशी अहवालानुसार कारवाईचे निर्देश सभापती आणि सचिवांना दिलेत.


सभापतींवर टांगती तलवार!
कृउबास सभापती संतोष टाले यांच्या अग्रीम वसुलीसंदर्भात विशेष लेखा परिक्षक डी.पी. जाधव यांनी आक्षेप नोंदविला होता. सभापती किंवा सदस्य यांना समितीच्या निधीमधून अग्रीम देण्याची तरतूद नसताना नियमबाह्य अग्रीम उचलने ही बाब उचित नसल्याचा शेरा नोंदविला होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कृउबासच्या एका संचालकांनी उचल केलेल्या रक्कमेचा व्याजासह भरणा केला आहे. या पार्श्वभूमीवर अग्रीम वसुलीसाठी सभापतींवरही टांगती तलवार कायम असल्याची चर्चा कृउबास वर्तुळात आहे.


तर कृउबासचे संख्याबळ पोहोचणार अवघ्या तीनवर!
४१८ सदस्यीय संचालक मंडळाच्या कृउबासमध्ये सद्यस्थितीत ९ संचालक आहेत. ९ संचालक यापूर्वीच बरखास्त झालेत. सतत सभांना गैरहजर असल्याने आता सहा संचालक बरखास्तीच्या रडारवर आहेत. या सहा संचालकांवर कारवाई झाल्यास कृउबासमध्ये सभापतींसह केवळ तीन सदस्यांचेच संख्याबळ कायम राहणार असल्याची चर्चा आहे.

Web Title: Six Directors of Khamgaon Bazar Samiti to be axed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.