‘वंचित’चे बुलडाणा जिल्ह्यातील सहा उमेदवार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 03:29 PM2019-10-01T15:29:17+5:302019-10-01T15:29:25+5:30

प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांच्या जागी राष्ट्रीय उपाध्यक्ष शरद वसतकार यांचे नाव यादीत आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Six candidates from Buldana district are declared by Vanchit Bahujan Aaghadi | ‘वंचित’चे बुलडाणा जिल्ह्यातील सहा उमेदवार जाहीर

‘वंचित’चे बुलडाणा जिल्ह्यातील सहा उमेदवार जाहीर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: लोकसभा निवडणुकीमध्ये आघाडी आणि युतीला चांगली टक्कर देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठीच्या जाहीर केलेल्या दुसºया यादीमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघापैकी सहा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांच्या जागी राष्ट्रीय उपाध्यक्ष शरद वसतकार यांचे नाव यादीत आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
यापूर्वी वंचित बहुजन आघाडीने उमेदवाराची आपली पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर ३० सप्टेंबरला दुसरी यादी जाहीर केली आहे. दरम्यान, एक आॅक्टोबर रोजी त्यांची तिसरी यादी जाहीर होणार असल्याचे संकेत आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात मलकापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीने डॉ. नितीन नांदुरकर यांच्या रुपाने उमेदवार दिला आहे. बुलडाण्यामध्ये मोताळा येथील डॉ. तेजल शरद काळे यांची वर्णी लागली असून चिखली मध्ये अशोक सुरडकर यांना संधी देण्यात आली आहे. मोताळा नगर पंचायतमध्ये त्या नगरसेविका आहे. २०१२ मध्ये डॉ. तेजल काळे यांनी भाजप-सेना-रिपाइंचे उमेदवार म्हणून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांना यश आले नव्हते. २०१५ मध्ये मनसेकडून त्यांनी नगर पंचायतीची निवडणूक लढवत प्रभाग चार मधून त्या विजयी झाल्या होता.
सिंदखेड राजामध्ये सविता मुंडे या वंचितच्या उमेदवार राहणार असल्याचे पूर्वी पासूनच संकेत होते. त्यावर दुसºया यादीत त्यांचे नाव आल्याने एक प्रकारे शिक्का मोर्तबच झाले आहे. माजी जिल्हा परिषद सदस्या असलेल्या सविता मुंडे यांनी यापूर्वी काही आक्रमक आंदोलनेही केली होती. गेल्यावर्षी सिंदखेड राजामध्ये काँग्रेसच्या तिकीटावर लढलेले प्रदीप नागरे यांच्या त्या भगिन होत. त्यांचे वडीलही जिल्हा परिषद सदस्य होते.
दरम्यान, खामगावमध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शरद वसतकार यांची वर्णी लागली आहे. त्यांना उमेदवारी दिल्याने खामगाव मतदारसंघात नेमके काय उलटफेर होतात याकडे सध्या लक्ष लागून आहे.
खामगावमधून वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता होती. मात्र येथे शरद वसतकार यांचे नाव समोर करण्यात आले आहे. जळगाव जामोद मध्येही भारीपचे जुने कार्यकर्ते शरद शिवाजी बनकर यांच्या नावाची घोषणा झाली आहे.
धक्कातंत्र वापरण्यात प्रकाश आंबेडकर हे तरबेज आहे. त्याच प्रमाणे त्यांनी वंचित बहुजन आघाडीची दुसरी यादी जाहीर करतानाही त्याचा वापर केला आहे. त्यामुळे त्याची जोरदार चर्चा सध्या जिल्ह्यात आहे.

चर्चेतील नावांना बगल
वंचित बहूजन आघाडीकडून बुलडाण्यामध्ये जितेंद्र जैन, मोहम्मद सज्जाद तथा विष्णू उबाळे यांच्या नावाची सातत्याने चर्चा होती. मात्र या तिघांना डावलून येथे डॉ. तेजल शरद काळे यांना उमेदवारी दिल्या गेली आहे. त्यामुळे हा विषयही चर्चेचा ठरत आहे.


सोनोनेंऐवजी वसतकार
 खामगाव विधानसभा मतदारसंघात २०१४ मध्ये तिसºया क्रमांकाची ४७ हजार ५४१ मते घेणारे भारिपचे अशोक सोनोने यांच्या ऐवजी येथे शरद वसतकार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या विधानसभा निवणुकीत अशोक सोनोने यांच्यामुळे उलटफेर झाला होता. यंदा मात्र त्यांच्या ऐवजी शरद वसतकरा यांचे नाव पुढे करण्यात येण्यामागे कोणते धक्कातंत्र आहे याची चर्चा खामगावामध्ये सध्या सुरू आहे.

Web Title: Six candidates from Buldana district are declared by Vanchit Bahujan Aaghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.