पितृपक्ष संपताच सहा अर्ज दाखल
By Admin | Updated: September 26, 2014 00:14 IST2014-09-26T00:14:38+5:302014-09-26T00:14:38+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात २१५ अर्जांची विक्री.

पितृपक्ष संपताच सहा अर्ज दाखल
बुलडाणा : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या पाचव्या दिवशी सातही विधानसभा मतदारसंघातून १२६ उमेदवारांनी २१५ उमेदवारी अर्ज नेले. तर सहा उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले. यामध्ये तीन विद्यमान आमदारांचा समावेश आहे.
चिखली विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसचे उमेदवार म्हणून विद्यमान आमदार राहुल बोंद्रे यांनी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे नेते व माजी खासदार मुकुल वासनिक, जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाभरातील नेते उपस्थित होते. आ. राहुल बोंद्रे यांनी दोन अर्ज दाखल केले. जळगाव जा. मतदारसंघातून अपर्णा संजय कुटे यांनी एक, तर भारत इंगळे यांनी एक नामांकन दाखल केले.
मेहकरमधून विठ्ठलराव ढाकरके यांनी एक अर्ज दाखल केला. सिंदखेडराजा, मेहकर आणि मलकापूर मतदारसंघातून आज एकही नामांकन नाही. दरम्यान, बुलडाणा मतदारसंघातून ११ उमेदवारांनी २१ अर्ज नेले. चिखलीतून २0 व्यक्तींनी ३0 अर्ज नेले. जळगाव जा.मधून १६ व्यक्तींनी ३५ अर्ज, खामगावमध्ये १५ व्यक्तींनी ३0 अर्ज, मेहकरमधून ४१ व्यक्तींनी ४१ अर्ज, सिंदखेडराजातून १७ व्यक्तींनी ४२ अर्ज आणि मलकापूर मतदारसंघातून सहा व्यक्तींनी १६ नामांकन अर्ज दाखल केले.
बुलडाणा येथील शिवसेनेचे उमेदवार तथा विद्यमान आमदार विजयराज शिंदे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाचे उमेदवार म्हणून विद्यमान आमदार तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. संजय कुटे यांनी आज रॅली काढून आपली उमेदवारी दाखल केली.
जळगाव जामोद मतदारसंघात आज भारिप-बमसंचे उमेदवार प्रसेनजित तायडे (पाटील) यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी धनंजय गोगटे यांच्याकडे सादर केला.