सिंदखेडराजात सिमेंट बंधा-याचे काम अर्धवट!
By Admin | Updated: March 22, 2017 01:50 IST2017-03-22T01:50:39+5:302017-03-22T01:50:39+5:30
कारवाई करण्याची जलसंधारण मंत्रालयाकडे मागणी.

सिंदखेडराजात सिमेंट बंधा-याचे काम अर्धवट!
सिंदखेडराजा, दि. २१- तालुक्यातील वडाळी शिवारात सिमेंट बांधाचे काम अर्धवट करुन देयके काढण्यात आल्याचा आरोप करीत संबंधितांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी रामदास कहाळे यांनी जलसंधारण मंत्रालय, मुंबई येथे दिलेल्या निवेदनातून केली आहे.
आडगावराजा येथील रामदास मानसिंग कहाळे यांनी यासंदर्भात २0 मार्चला मंत्रालयात मुख्यमंत्र्यांसह, जलसंधारण मंत्री तसेच सचिव यांना निवेदन दिले आहे. सदर निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील वडाळी शिवारात ग्रामविकास व जलसंधारण लघुसिंचन विभागामार्फत सन २0१५ मध्ये तीन सिमेंट बांध मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार जल व भूमी संधारण होऊन शेतकर्यांना उपयोगी बंधारे बांधकाम होण्याची अपेक्षा होती; मात्र ठेकेदार व संबंधित अधिकारी यांनी संगनमत करीत काम इस्टीमेट प्रमाणे केले नाही. तसेच माळरानाचा दगड वापरत तीनही सिमेंट बांधाची कामे थातुरमातूर करीत निकृष्ट दर्जाची केलेली आहेत. सदर कामामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करुन, या सिमेंट बांधांचे अंकेक्षण करीत सक्षम अधिकार्यांकडून चौकशी करावी. तसेच निकृष्ट बांधकामे करुन शेतकर्यांची क्रूर चेष्टा करणार्या संबंधित अभियंत्यास तत्काळ निलंबित करावे, तसेच कंत्राटदाराकडून रक्कम वसुली करण्यात येऊन, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच कंत्राटदाराचा परवाना रद्द करण्यात यावा, अशी मागणी रामदास मानसिंग कहाळे यांनी निवेदनातून केली आहे. या निवेदनामुळे तालुक्यातील जलयुक्त शिवार कामातील फोलपणा चव्हाट्यावर आला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.