एकाच पावसात सिंदखेड पाणीदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:39 IST2021-09-12T04:39:38+5:302021-09-12T04:39:38+5:30
नवीन मोदे/ धामणगाव बढे मोताळा तालुक्यातील सिंदखेड प्रजा येथे सहा व सात सप्टेंबरदरम्यान झालेल्या पावसामध्ये एकशे दहा मिलिमीटर पावसाची ...

एकाच पावसात सिंदखेड पाणीदार
नवीन मोदे/ धामणगाव बढे मोताळा तालुक्यातील सिंदखेड प्रजा येथे सहा व सात सप्टेंबरदरम्यान झालेल्या पावसामध्ये एकशे दहा मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे या परिसरातील शेतीची व पिकांचे कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले; परंतु पाणी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेंतर्गत, तसेच जलयुक्त शिवार योजनेच्या अंतर्गत झालेला ६५ हजार घनमीटर कामामुळे व १४ कोल्हापुरी बांधामुळे सुमारे १० कोटी लिटर पाणी एकाच दिवशी साठवले गेले. या अगोदर यावर्षी या परिसरात अत्यल्प पाऊस पडला होता. वरील कामाच्या उपचारामुळे ही कामे झाली नसती, तर काही तासांत पडलेल्या प्रचंड पावसाचे सुमारे १० कोटी लिटर पाणी शेतशिवारात वाहून मोठे नुकसान झाले असते. त्यामुळे पाणी फाउंडेशनच्या व जलयुक्त शिवार योजनेच्या कामाचा सिंदखेड प्रजावासीयांना मोठा फायदा झाला आहे व एकाच दिवसात गाव पाणीदार बनले आहे. २०१८ साली प्रवीण कदम यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांच्या सहकार्याने गावाने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकापर्यंत मजल मारली होती, तसेच जलयुक्त शिवार योजनेंतर्गत परिसरात सुमारे १४ कोल्हापुरी बांध बांधण्यात आले होते. त्यामुळे मागील वर्षात परिसरातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
ग्रामस्थांच्या परिश्रमाचे फलित
गावकऱ्यांच्या परिश्रमाचे चीज झाले असून, आज त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. यापुढेही गावकऱ्यांच्या एकजुटीतून गावाची वाटचाल शाश्वत विकासाकडे होत राहील, असा आशावाद शिंदखेड प्रजेच्या सरपंच सीमा प्रवीण कदम यांनी व्यक्त केला.