शासकीय कापूस खरेदी केंद्रावर शुकशुकाट
By Admin | Updated: January 11, 2016 01:40 IST2016-01-11T01:40:27+5:302016-01-11T01:40:27+5:30
पणन महासंघाची ७ हजार तर सीसीआयची केवळ २ हजार क्विंटल खरेदी

शासकीय कापूस खरेदी केंद्रावर शुकशुकाट
नाना हिवराळे / खामगाव: यावर्षीच्या कापूस हंगामात शासकीय हमीभावापेक्षा खाजगी व्यापार्यांनी चढत्या भावाने कापूस खरेदी सुरु केल्याने शासकीय कापूस खरेदी केंद्रावर शुकशुकाट दिसून येत आहे. जिल्ह्यात खाजगी व्यापार्यांनी तब्बल दीड लाख क्विंटलपेक्षा अधिक कापूस खरेदी केली असतानाच पणन महासंघाची ७ हजारपेक्षा जास्त तर सीसीआयची केवळ दोन हजार क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांचा कल प्रामुख्याने थोड्याश्या जादा भावासाठी खासगी व्यापार्यांकडे असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. त्यातच गुजरातमध्येही कापसाला चांगला भाव मिळत असल्याने अनेक शेतकर्यांनी त्यांचा कापूस गुजरात राज्यात विक्रीसाठी नेला असल्याचे निदर्शनास येत आहे. दुसरीकडे जिल्ह्यात पणन महासंघाची देऊळगाव राजा, जळगाव जामोद, शेगाव व दाताळा येथे कापूस खरेदी केंद्र नोव्हेंबर महिन्यात उघडण्यात आली होती. दिवाळीपूर्वीच कापूस खरेदीचा बार उडाला खरा. परंतु यावर्षी गतवर्षीपेक्षा कापसाच्या भावात केवळ ५0 रुपये नाममात्र भाववाढ करण्यात आली. अशातच दरवर्षी शेतकर्यांना थेट चेकव्दारे नगदी चुकारे केले जात असतांना यावर्षी प्रथमच पणन महासंघातर्फे आरटीजीएस व एनईएफटीव्दारे कापसाचे चुकारे करण्याचे धोरण अवलंबिले. ४१00 रुपये प्रतिक्विंटल कापसाचा हमीदर ठरविण्यात आला. शेतकर्यांनी अपेक्षीत कापसाची भाववाढ न झाल्याने रोष व्यक्त केला असतानाचा शासकीय कापूस खरेदीकडे पाठ फिरविली. जिल्ह्यात आतापर्यंंंत केवळ ७ हजारापेक्षा जास्त कापूस खरेदी झाली असून केंद्रावर कापूस येण्याची वाट पाहावी लागत आहे. त्यातच सलग दोन वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीचाही फटका कापूस उत्पादकांना बसल्याची भावना व्यक्त होत आहे.