स्वस्त धान्य दुकानदारांचे आंदोलन
By Admin | Updated: February 11, 2015 01:07 IST2015-02-11T01:07:40+5:302015-02-11T01:07:40+5:30
देऊळगावराजात मोर्चा; मोताळा, मेहकर, सिंदखेडराजा येथे स्वस्त धान्य दुकानदारांचे धरणे आंदोलन.

स्वस्त धान्य दुकानदारांचे आंदोलन
बुलडाणा : स्वस्त धान्य दुकानदार, केरोसिन परवानाधारक यांच्या कमिशनमध्ये तसेच त्यांच्या मानधनात वाढ करावी, या मागणीसाठी स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसिन परवानाधारक संघटना यांच्यावतीने १0 फेब्रुवारी रोजी जिल्हाभरात आंदोलन छेडण्यात आले. बुलडाणा, मेहकर, मोताळा, खामगाव, देऊळगावराजासह सर्व तहसील कार्यालयापुढे संघटनेच्यावतीने धरणे देण्यात आले. २६ जानेवारी रोजी स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक संघटनेची पुणे येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी संघटनेच्यावतीने आंदोलनात्मक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार बुलडाणा तहसील कार्यालयापुढे १0 फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजात संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. राज्यभरात करण्यात आलेली केरोसिनची कपात रद्द करून कोटा पूर्ववत करण्यात यावा, स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन विक्रेत्याच्या समस्यांचा शासनाने प्रत्येक तीन महिन्यानंतर आढावा द्यावा आदी मागण्यांसंदर्भात यावेळी संघटनेच्या पदाधिकार्यांनी तहसीलदार अशोक बाजाड यांना निवेदन दिले. यावेळी माणिकराव सावळे, सुनील बराडे, आर.आर. अवेंकर, सावजी जाधव, जी.एस. अग्रवाल, बी.बी. गव्हाण, टी.बी. पवार, गीताबाई अग्रवाल, सारंधर वाघ, अनुसयाबाई मोरे, टी. माळोदे आदीसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते