रात्रीच्या अंधारात ‘एफसीआय’कडून व्यापाऱ्यांची तूर खरेदी
By Admin | Updated: April 13, 2017 01:12 IST2017-04-13T01:12:05+5:302017-04-13T01:12:05+5:30
नांदुरा- शेतकऱ्यांचा संताप पाहता बाजार समिती कर्मचाऱ्यांनी उशीरा रात्री त्या व्यापाऱ्यांच्या मालाचे एकशे चौदा कट्टे सिल केले व पो.स्टे. ला तक्रार दिली.

रात्रीच्या अंधारात ‘एफसीआय’कडून व्यापाऱ्यांची तूर खरेदी
नांदुरा : बारदाना नसल्याने आधीच खोळंबलेली शासकीय भारतीय खाद्य निगमची तुर खरेदी चार दिवसांपुर्वी पुर्ववत झाली तोच ११ एप्रिलच्या रात्री अंधारात भारतीय खाद्य निगम चा मार्क असलेल्या पोत्यात तीन, चार दिवसांपुर्वी अचानक येवून पडलेल्या व्यापाऱ्यांच्या तुरीची खरेदी सुरु केली. मात्र महिनाभरापासुन बाजार समितीत तूर विक्रीसाठी हालअपेष्टा सहन करुन त्रासलेल्या शेतकऱ्यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी संगठीत होवून याबाबत संबंधीत हमाल यांना धारेवर धरले असता त्यांनी पळ काढला. शेतकऱ्यांचा संताप पाहता बाजार समिती कर्मचाऱ्यांनी उशीरा रात्री त्या व्यापाऱ्यांच्या मालाचे एकशे चौदा कट्टे सिल केले व पो.स्टे. ला तक्रार दिली.
मागील दोन महिन्यात जेमतेम विस दिवस भारतीय खाद्य निगमकडून तूर खरेदी झाली. त्यामुळे आजही मागील चाळीस दिवसांपासून शेतकरी तूर विकण्यासाठी ठाण मांडून आहेत. सुमारे चार दिवसांपुर्वी बारदाना उपलब्ध झाल्याने खरेदी सुरु झाली. मात्र पुर्वीप्रमाणे यात हेराफेरी होत असल्याचा संशय शेतकऱ्यांना आल्याने त्यांनी पाळत ठेवली असता ११ च्या रात्री दोन ते तीन दिवसांपुर्वी बाजार समितीत येवून पडलेल्या व्यापाऱ्यांच्या तुरीचे मोजमाप सुरु झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. शेतकऱ्यांनी याबाबत सदर हमालांच्या बारदान्याची तपासणी केली असता तो भारतीय खाद्य निगमचा असल्याचे सिध्द झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी याबाबत बाजार समिती संचालक व कर्मचारी यांना फोन करुन या सर्व अनागोंदी कारभाराबाबत जाब विचारला असता त्यांनी दाखल होवून तो माल जप्त केला. याबाबत बाजार समितीने १२ एप्रीलच्या दुपारी पोलीस स्टेशन नांदुरा येथे लेखी तक्रार दिली. यामध्ये अफजल नामक हमाल व इतर तिघांनी कोणतीही परवानगी नसतांना तुरीचा शेतमाल मोजल्याचे नमुद केले असून संबधीतांवर कडक कारवाई त्याचबरोबर याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. १२ च्या दिवसभर शेतकऱ्यांनी याबाबत सर्व अधिकारी व कर्मचारी यांना धारेवर धरले व तो शासकीय बारदाना त्या हमालांना कसा मिळाला याबाबत जाब विचारुन तिव्र नाराजी बाजार समिती, भारतीय खाद्य निगम व खरेदी विक्री संघाबाबत व्यक्त केली. तसेच यापुर्वी ३ मार्चला खरेदीतील अनागोंदी विरोधात आवाज उठविल्यानंतर जो तुरीचा साठा जप्त झाला होता त्यापैकी काही जप्त माल गायब झाल्याने शेतकरी संतप्त झाले होते.
ग्रेडर खर्चे यांचे घुमजाव
तर शेतकऱ्यांचा निकृष्ठ तुरीचा माल नाकारणाऱ्या ग्रेडर खर्चे यांना रात्री व्यापाऱ्याचा निकृष्ठ माल कसा पोत्यात गेला, हमालांना बारदाना कोणी दिला, पुर्वी जप्त केलेला माल कसा गायब झाला आदी प्रश्न विचारुन धारेवर धरले असता त्यांनी घुमजाव करीत असमाधानकारक उत्तरे दिल्याने शेतकरी संतप्त झाले होते.