धक्कादायक! अंत्यविधीसाठी नेलेली मुलगी निघाली जिवंत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 03:16 PM2018-11-17T15:16:22+5:302018-11-17T15:35:53+5:30

जळगाव जामोद येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पळशी सुपो येथील अपघातग्रस्त ६ वर्षीय अर्पिता दीपक दाभाडे हिला अंत्यविधीसाठी स्मशानभूमीमध्ये नेत असताना ती जिवंत असल्याची धक्कादायक घटना १६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजताचे दरम्यान लक्षात आली.

Shocking .... The girl who took the funeral came out alive | धक्कादायक! अंत्यविधीसाठी नेलेली मुलगी निघाली जिवंत

धक्कादायक! अंत्यविधीसाठी नेलेली मुलगी निघाली जिवंत

Next

जळगाव जामोद : तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पळशी सुपो येथील अपघातग्रस्त ६ वर्षीय अर्पिता दीपक दाभाडे हिला अंत्यविधीसाठी स्मशानभूमीमध्ये नेत असताना ती जिवंत असल्याची धक्कादायक घटना १६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजताचे दरम्यान लक्षात आली. यामुळे तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेवून तिला पुढील उपचारार्थ अकोला येथे पाटविण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून ही घटना वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आहे.
१५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ४ वाजता दीपक महादेव दाभाडे (रा.पळशी सुपो) यांनी अर्पिता हिला अपघातग्रस्त अवस्थेत जळगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केली असता तिच्या डोक्याला गंभीर इजा झालेली असल्याने तिची प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे पुढील उपचारार्थ खामगाव येथे तिला रेफर करण्यात आले. खामगाव येथील सिल्व्हरसिटी या खासगी रुग्णालयात तिला उपचारार्थ दाखल करण्यात आले.
त्यानंतर शुक्रवारी १६ नोव्हेंबर रोजी दुपारी अर्पिताला पळशी येथे आणले व ती मृत झाली असे समजून तिचे अंत्यविधीची तयारी करण्यात आली व नातेवाईकांनी तिला संध्याकाळी पाच वाजेदरम्यान स्मशानात नेले. तेथे सदर मुलगी जिवंत असल्याचे नातेवाईकांचे लक्षात आले. तेव्हा एकच खळबळ उडाली. लगेच स्थानिक डॉ. भोपळे यांना बोलावण्यात आले असता त्यांनी सदर मुलगी जीवंत असल्याचे सांगताच नातेवाईकांनी तिला घेऊन जळगाव ग्रामीण रुग्णालय गाठले. तेथे डॉक्टर केदार यांनी उपचार करून तिला पुढील उपचारार्थ अकोला रेफर केले.
यासंदर्भात जळगाव ग्रामीण रूग्णालयाचे क्ष किरण सहाय्यक अनिल डाबेराव यांनी जळगाव पोलीस स्टेशनला सदर रूग्ण उपचारार्थ खामगाव रेफर केल्याचे मेमो १५ नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजता सादर केला होता. यासंदर्भात रुग्णाच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. त्या मुलीच्या एका दूरच्या नातेवाईकाने तिला अकोला येथे भरती केल्याचे सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे घाटाखालील तालुक्यात खळबळ उडाली आहे.


कु.अर्पिता हिला १५ व १६ नोव्हेंबर दोन्ही दिवशी ग्रामीण रूग्णालयात मी तपासले असता ती बेशुध्दावस्थेत होती. डोक्याला मार लागल्याने ती प्रकृती गंभीर होती. त्यामुळे तिला १५ नोव्हेंबर रोजी खामगाव येथे रेफर केले. तर शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजताचे दरम्यान पुन्हा तपासले तेव्हा ती जीवंत होती. परंतु प्रकृती गंभीरच होती. त्यामुळे पुढील उपचारार्थ अकोला शासकीय रूग्णालय येथे रेफर केले.
- डॉ.दिपक केदार, ग्रामीण रूग्णालय जळगाव जामोद.
 

 

गंभीर जखमी अवस्थेत दाखल झालेल्या चिमुकलीची योग्य ती काळजी घेण्यात आली. तिच्या प्रकृतीविषयी सर्वोतोपरी माहिती दिल्यानंतरही नातेवाईकांनी तिला शनिवारी दुपारी रूग्णालयातून हलविले. तिला रूग्णालयातून हलविण्यात आल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी लेखी दिले आहे.
-डॉ. भगतसिंह राजपूत
मुख्य कार्यकारी अधिकारी
सिल्व्हरसिटी हॉस्पीटल, खामगाव.

 

Web Title: Shocking .... The girl who took the funeral came out alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.