ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेची उडी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 12:10 IST2020-12-28T12:10:43+5:302020-12-28T12:10:53+5:30
Gram Panchayat election : शिवसेनेचे सरपंच, उपसरंपच अधिक कसे होतील यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना खासदार प्रतापराव जाधव यांनी दिल्या आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेची उडी!
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : ऐरवी कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून बघितल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेने उडी मारली असून, राजकारणाचा पाया म्हणून पाहल्या जाणाऱ्या या निवडणुकीत पदाधिकाऱ्यांनी अधिक लक्ष घालून शिवसेनेचे सरपंच, उपसरंपच अधिक कसे होतील यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना खासदार प्रतापराव जाधव यांनी दिल्या आहेत.
तसे ग्रामपंचायत निवडणुकीत थेट पक्षाचा सक्रिय सहभाग कमी असतो. गावातील गटातटाच्या राजकारणामुळे आपल्या प्रतिमेला धक्का लागणार नाही, याची काळजी खासदार, आमदार आणि जिल्हा परिषद सदस्य घेत असतात. मात्र यावेळी जिल्ह्यात होत असलेल्या ५२७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने अधिक रस घेतल्याचे समोर येत असून, २५ डिसेंबर रोजी खुद्द खासदार प्रतापराव जाधव यांनी यासंदर्भाने पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन अधिकाधिक ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे कसे वर्चस्व राहील या मुद्द्यावर मंथन केले. बुलडाणा येथे झालेल्या शिवसेनेच्या या बैठकीस पंचायत समितीचे अध्यक्ष तथा आमदार डॉ. संजय रायमुलकर, आमदार संजय गायकवाड, माजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर, जिल्हाप्रमुख तथा बाजार समिती सभापती जालिंदर बुधवत, जिल्हा प्रमुख शांताराम दाणे, बळीराम मापारी, सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील, युवा सेना जिल्हा प्रमुख ऋषी जाधव, मुंबई बाजार समितीचे संचालक माधवराव जाधव, जिल्हा परिषदचे सभापती राजेंद्र पळसकर, बाबूराव मोरे यांच्यासह अन्य पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. शिवेसना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुका अधिक गांभिर्याने घेतल्या असून, या माध्यमातून शिवसेनेचे ग्रामीण भागात वर्चस्व निर्माण करण्यासोबतच संघटनात्मक बांधणीसाठीही या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. शिवसेनेचे प्राबल्य वाढविण्यासाठी या निवडणुका अधिक गांभीर्याने घेण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यावेळी आमदार डॉ. संजय रायमुलकर, आमदार संजय गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीचे प्रास्ताविक शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी केले. सूत्रसंचालन गजानन धांडे यांनी केले. जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते.