..अखेर शिर्ला नेमाणे येथील दारूअड्डे उद्ध्वस्त
By Admin | Updated: January 22, 2015 00:42 IST2015-01-22T00:42:37+5:302015-01-22T00:42:37+5:30
गावक-यांच्या तक्रारीच पोलिसांनी घेतली दखल.

..अखेर शिर्ला नेमाणे येथील दारूअड्डे उद्ध्वस्त
शिर्ला नेमाणे (जि. बुलडाणा) : तालुक्यातील शिर्ला नेमाणे गावात दारूबंदी करावी, यासाठी गावकर्यांनी केलेल्या तक्रारीची दखल पोलिसांना घ्यावी लागली. बुधवार, २१ जानेवारी रोजी पोलीस पथकाने गावात येऊन अवैध दारुविक्री करणार्यांचे साहित्य ताब्यात घेतले.
शिर्ला नेमाणे गाव तसेच शिवारात मोठय़ा प्रमाणात अवैधरीत्या दारू गाळली जाते तसेच अवैधरीत्या दारूविक्री करण्यात येते. यामुळे गावात व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले असून, अनेकांचे संसारात कटकटी निर्माण झाल्या आहेत. शिवाय यामुळे गावात भांडण-तंटे वाढले आहेत. याबाबत तंटामुक्त समितीने हिवरखेड पोलीस स्टेशनकडे गावातील अवैध दारू विकणार्यांचा बंदोबस्त करुन दाूरूबंदीची मागणी केली होती तसेच याबाबत पाठपुरावा सुरू ठेवला. त्यामुळे हिवरखेडचे ठाणेदार अढावू यांनी आज २१ जानेवारी रोजी आपल्या ताफ्यासह शिर्ला नेमाणे येथे भेट दिली तसेच गावशिवारात नाल्याकाठी गाळल्या जाणार्या दारूअड्डय़ांचा शोध घेत दारूभट्टय़ा उद्ध्वस्त करून साहित्य जप्त केले तसेच डबे फोडण्यात आले. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण ताले, बंडुबाप्पू देशमुख, अनिरुद्ध नेमाणे, सुधाकार नेमाणे, सरपंच मनीषाताई नारायण शिंदे यांच्यासह गावकरी तसेच महिला उपस्थित होत्या. पोलिसांनी गावात वचक निर्माण करून दारूबंदीची अंमलबजावणी नियमित ठेवावी, अशी मागणी यावेळी गावकर्यांनी ठाणेदार अढावू यांच्याकडे केली.
* दारूविक्रेते हुशार
गावातील अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाईसाठी पोलीस येत असल्याची भनक दारूविक्रेत्यांना लागली होती. त्यामुळे एकही दारूविक्रेत्याला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. दारूविक्रेते पोलिसांपेक्षाही हुशार झाल्याचे मत यावेळी गावकर्यांकडून व्यक्त होत होते.