आश्रमशाळा विद्यार्थ्यांसाठी शिक्षणमित्र संकल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 11:49 AM2021-05-17T11:49:45+5:302021-05-17T11:50:14+5:30

Khamgaon News : अतिदुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी शिक्षणमित्र ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. 

Shikshanmitra concept for ashram school students | आश्रमशाळा विद्यार्थ्यांसाठी शिक्षणमित्र संकल्पना

आश्रमशाळा विद्यार्थ्यांसाठी शिक्षणमित्र संकल्पना

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क    
खामगाव : कोरोनामुळे येत्या शैक्षणिक वर्षात आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आदिवासी विकास विभागाकडून नवीन शैक्षणिक वर्षात ‘अनलॉक लर्निंग दोन’चे नियोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत दुर्गम, अतिदुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी शिक्षणमित्र ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. 
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शैक्षणिक क्षेत्रात ‘ऑनलाइन लर्निंग’, ‘स्टडी फ्रॉम होम’ अशा विविध संकल्पना राबविण्यात आल्या. मात्र इंटरनेट कनेक्टिव्हिटी, तंत्रज्ञानाचा अभाव, भौगोलिक प्रतिकूल परिस्थिती यामुळे या संकल्पनांना खोडा बसला होता. गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेता यातील त्रुटी दूर करून विद्यार्थ्यांपर्यंत नियमितपणे शिक्षण पोहोचत रहावे यासाठी आदिवासी विकास विभागानेदेखील कंबर कसली आहे.
आदिवासी विकास विभागाकडून चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळांमधील विद्यार्थी हे दुर्गम, अतिदुर्गम भागातील असल्याने त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहचविण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात. आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत सहज व सातत्यपूर्ण शिक्षण पोहोचत राहावे यासाठी नवीन शैक्षणिक वर्षात ‘अनलॉक लनिंग दोनमध्ये शिक्षणमित्र’ ही संकल्पना आदिवासी विकास विभागाकडून राबविली जाणार आहे. या संकल्पनेंतर्गत गावातील बारावी उत्तीर्ण किंवा त्यापेक्षा पुढील शिक्षण झालेल्या गावातील एका तरुणाची किंवा विद्यार्थीसंख्येच्या प्रमाणानुसार एकापेक्षा अधिक तरुणांची शिक्षणमित्र म्हणून नेमणूक केली जाणार आहे. हे शिक्षणमित्र शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील दुवाचे काम करणार आहेत. एका गावात विविध आश्रमशाळेतील शिक्षण घेणारे विद्यार्थी राहत असतात. शिक्षणमित्र अशा विविध आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना एकत्रित करून शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षकांनी उपलब्ध करून दिलेल्या शैक्षणिक साहित्याचा वापर करून गावातील विद्यार्थ्यांकडून अभ्यास व स्वाध्याय करवून घेणार आहे. शिक्षणमित्राला आदिवासी विकास विभागाकडून दोन हजार रुपये मासिक मानधन व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. साधारणपणे जून ते सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमता विकसित करण्यावर भर देण्यात येणार असून, मोठ्या वर्गांना गणित, विज्ञान, इंग्रजीचे अध्यापन अनलॉक लर्निंग दोनमध्ये केले जाणार आहे. आवश्यकतेनुसार मराठी भाषेचेदेखील अध्यापन केले जाईल. अनलॉक लर्निंगसाठी प्रकल्प स्तरावर शैक्षणिक साहित्य तयार करून १५ जूनपर्यंत पुरवठा करण्याचे नियोजन केले गेले आहे. दरम्यान, १५ जूनपासून अनलॉक लर्निंग दोन सुरू होणार आहे. यासाठी आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांचा लसीकरणचा अहवाल सादर करणे शाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. 
 

Web Title: Shikshanmitra concept for ashram school students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.