शेलगाव बाजार गावावर शोककळा!
By Admin | Updated: April 25, 2017 00:36 IST2017-04-25T00:36:48+5:302017-04-25T00:36:48+5:30
धुळे-सोलापूर महामार्गावर अपघात : रात्री उशिरा मृतकांवर अंत्यसंस्कार

शेलगाव बाजार गावावर शोककळा!
धामणगाव बढे : मोताळा तालुक्यातील शेलगाव बाजार येथील भजनी मंडळ पंढरपूर येथे जात असताना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाणगाव फाट्याजवळ सोमवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास ट्रक व जीपचा भीषण अपघात झाला. त्यामध्ये चार जण जागीच ठार झाले. त्यामध्ये दोन पुरुष व दोन महिला प्रवाशांचा समावेश आहे.
बुलडाणा विधानसभा क्षेत्रातील २५० गाड्यांचा ताफा बुलडाणा येथून रविवारी सायंकाळी पंढरपूरसाठी रवाना झाला. यापैकी एम.एच.२८ सी २३५३ या जीप गाडीला बिडनजिक भीषण अपघात झाला. त्यामध्ये शेलगाव बाजार येथील ग्रा.पं.सदस्य पद्माकर निनाजी खर्चे (वय ४०), दिनेश निवृत्ती खर्चे (वय ५५), जया विलास चोपडे (वय ५०), अक्षदा संजय चौधरी (वय १७) यांचा जागीच मृत्यू झाला असून, यापैकी तिघेजण शेलगाव बाजार येथील रहिवासी होते. अक्षदा चौधरी ही दाताळा येथील शिक्षक संजय चौधरी यांची मुलगी होती. अपघातानंतर जखमींना बिड येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले, तर गावातील तिघांचा मृत्यूमुळे शेलगाव बाजार व परिसरात शोककळा पसरली होती. दरम्यान, आ.चैनसुख संचेती, संजय गायकवाड, खा.प्रतापराव जाधव, ना.रविकांत तुपकर, आ. हर्षवर्धन सपकाळ, जिल्हाध्यक्ष धृपतराव सावळे, माजी आ. विजयराज शिंदे, मुक्त्यारसिंग राजपूत, अशांत वानखेडे आदींनी मृतकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. रात्री १० वाजेच्या सुमारास मृतकांवर अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी धृपतराव सावळे, अशांत वानखेडे, भोजराज पाटील यांच्यासह रावसाहेब देशमुख, योगेंद्र गोडे, ठाणेदार दीपक वळवी, संतोष तांदूळकर आदी उपस्थित होते.
दुर्दैवी योगायोग
दाताळा येथील अक्षदा नुकतीच दहावीची परीक्षा देऊन मामाच्या गावाला दोन दिवसांपूर्वी आली होती. शेलगाव येथील डॉ. खर्चे यांचे पंढरपूरला जाने वेळेवर रद्द झाले, त्यांच्या जागी अक्षदा गेली आणि तिचा हा प्रवास शेवटचा ठरला. तिच्या आई-वडिलांची ती एकुलती एक मुलगी होती.