बुलडाणा जिल्ह्यात शंतनु लद्धड प्रथम
By Admin | Updated: June 7, 2016 07:42 IST2016-06-07T07:42:18+5:302016-06-07T07:42:18+5:30
बुलडाणा जिल्हा विभागात प्रथम; निकालात मुलींची बाजी.

बुलडाणा जिल्ह्यात शंतनु लद्धड प्रथम
बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्याने यावर्षीसुद्धा दहावीच्या परीक्षेत अमरावती विभागात प्रथम क्रमांक पटकावून आपला लौकिक कायम ठेवला आहे. जिल्ह्याचा निकाल ८८.९१ टक्के एवढा लागला आहे. बुलडाण्यातील सेंट जोसेफ इंग्लिश हायस्कूलचा विद्यार्थी व प्रख्यात डॉक्टर दीपक व डॉ. संगीता लद्धड यांचा मुलगा शंतनु लद्धड याने दहावीच्या परीक्षेत ५00 पैकी ४९३ म्हणजेच ९८.६0 टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल स्थान मिळवले आहे. बुलडाण्याच्या भारत विद्यालयातील पूनम राऊत, वैष्णवी राठी, स्नेहा गजानन खर्चे, हर्षद पंजाबराव अंभारे या चौघांनाही ९८.२0 टक्के गुण मिळाले असून, त्यांनी गुणवत्तेचा झेंडा उंचविला आहे.
विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांची टक्केवारी ही गुणांचा पाऊस पडावा अशी अचंबित करणारी असून, क्रीडा गुणांमुळे तर काही विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. जिल्ह्याच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून, मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९0.४१ टक्के एवढे आहे.
जिल्ह्यातील ४९२ शाळांमधून ४१ हजार २७१ विद्यार्थी नोंदविल्या गेले होते. प्रत्यक्षात ४१ हजार १४८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये ३६ हजार ५८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, हा निकाल ८८.९१ टक्के एवढा लागला आहे. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८७.६९ एवढे असून, मुलींची टक्केवारी ९0.४१ टक्के एवढी आहे. तर मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यामध्ये मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९७.२७ टक्के एवढे असून, जिल्ह्यात हा तालुका ९५.७६ टक्के निकाल देत अव्वल ठरला आहे, तर त्या खालोखाल दे. राजा ९३.९0 टक्के व मोताळय़ाचा ९३.५0 टक्के निकाल देत दुसरा व तिसर्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे, तर सर्वाधिक कमी निकाल शेगाव तालुक्याने ८१.५५ टक्के दिला आहे. बुलडाणा तालुक्यातून ४ हजार ७२६ मुले पास झाली. मोताळा तालुक्यातून २ हजार ११३ विद्यार्थी पास झाले आहेत. चिखली तालुक्यात ४ हजार ४८९ विद्यार्थी पास झाले. देऊळगावराजा तालुक्यात २२४९ विद्यार्थी पास झाले. सिंदखेडराजा तालुक्यात २४८७ विद्यार्थी पास झाले. लोणार तालुक्यात २३४६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी २0४९ विद्यार्थी पास झाले आहेत. मेहकर तालुक्यात ४१९२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ३६२८ विद्यार्थी पास झाले. खामगाव तालुक्यातून ४ हजार ८५0 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ४ हजार १९२ विद्यार्थी पास झाले. शेगाव तालुक्यात २ हजार १४४ विद्यार्थी पास झाले. नांदुरा तालुक्यात २ हजार २५0 विद्यार्थी पास झाले. मलकापूर २ हजार ६३८ विद्यार्थी पास झाले. जळगाव जामोद तालुक्यात २0९५ विद्यार्थी पास झाले. संग्रामपूर तालुक्यात १७९७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १ हजार १५२५ विद्यार्थी पास झाले.