शबनम बॅग कापून अडीच लाख लंपास
By Admin | Updated: November 4, 2015 02:57 IST2015-11-04T02:57:15+5:302015-11-04T02:57:15+5:30
बसस्थानकावरील घटना; अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल.

शबनम बॅग कापून अडीच लाख लंपास
बुलडाणा : पोलिसांचा धाक संपल्यामुळे चोरट्यांची मुजोरी वाढली आहे. जिल्ह्यात दररोज अनेक ठिकाणी चोरीच्या लहान-मोठय़ा घटना घडत असताना मंगळवारी बुलडाणा बसस्थानकावर २ लाख ४८ हजार रुपयांची रोकड अज्ञात आरोपींनी लंपास केल्याची घटना सकाळी ९.३0 वाजेदरम्यान घडली. या घटनेमुळे शहर परिसरात खळबळ उडाली आहे. बुलडाणा शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या बुलडाणा बसस्थानकावर नेहमीच लहान- मोठय़ा चोरी, खिसे कापण्याचा घटना घडत असतात; मात्र या प्रकरणातील आरोपींना एकदाही अटक केल्याची नोंद नाही. त्यामुळे अनेक भुरटे चोर दिवसा रात्री प्रवाशांना त्रास देण्याचे काम करतात. सध्या दिवाळी सणाचे दिवस जवळ येत असल्यामुळे बसस्थानकावर गर्दी वाढली आहे. त्याचा फायदा घेत अनेक चोरटे जिल्ह्याबाहेरून आले आहेत. त्यामुळे दररोज लहान-मोठय़ा चोरीच्या घटना घडत आहेत. दरम्यान, आज चैतन्यवाडीतील जनार्दन बाळकृष्ण पाटील वय ७५ हे २ लाख ४८ हजार रुपये रोकड शबनम बॅगमध्ये घेऊन गावाला जाण्यासाठी निघाले. सकाळी ९.३0 वाजता बसस्थानकावर पोहोचल्यानंतर ते बुलडाणा ते सोनाळा एसटी बसमध्ये चढले. यावेळी त्यांना आपल्या खांद्यावरील शबनम बॅगेतले वजन कमी वाटले असता, त्यांनी बॅगेची पाहणी केली. यावेळी त्यांना शबनम बॅग कापलेली दिसली व त्यातील २ लाख ४८ हजार रुपये लंपास झालेले दिसले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली; मात्र पैसे लंपास करणारे मिळून आले नाही. याप्रकरणी जनार्दन पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास एएसआय कवास करीत आहेत.