भोसा गावात भीषण पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:35 IST2021-04-24T04:35:03+5:302021-04-24T04:35:03+5:30
भोसा : मेहकर तालुक्यातील भोसा येथे गत काही दिवसापासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ ग्रामपंचायत प्रशासनाच्या नियाेजन शून्य ...

भोसा गावात भीषण पाणीटंचाई
भोसा : मेहकर तालुक्यातील भोसा येथे गत काही दिवसापासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ ग्रामपंचायत प्रशासनाच्या नियाेजन शून्य कारभारामुळे ग्रामस्थांना एक किमी वरून पाणी आणावे लागत आहे़ एप्रिल महिन्यातच गावाला पाणीपुरवठा करणारा तलाव काेरडाठाक पडला आहे़
भाेसा हे गाव आदिवासी बहुल असून अति दुर्गम भागात आहे. या गावाची लोकसंख्या २,५०० असून या गावामध्ये ७० लोक आदिवासी बहुल आहेत. या गावात ग्रामपंचायत मार्फत पिण्याच्या पाण्यासाठी पाच लक्ष रुपये खर्च करुन वॉटर फिल्टर (आरो) उभा करण्यात आला आहे़ या आरोमधून एक ही दिवस पिण्याचे शुद्ध पाणी भोसा गावातील नागरिकांना मिळाले नाही. हे पाणी फिल्टर आरो ही शोभेची वस्तू बनली आहे. या आरो प्लांटची मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी चौकशीचे आदेश दिले हाेते़ मात्र, या प्रकरणाची अजूनही चाैकशी झालेली नाही़
गत दोन महिन्यापासून भोसा गावात ग्रामसेवक आर. जी. कृपाळ यांचे दर्शन न झाल्याने विकास कामे ठप्प झाले आहेत़ ग्रामपंचायतच्या नियोजन शून्य कारभारामुळे भोसा गावातील महिलांना १ किमी अंतरावरुन डोक्यावर हंंडे घेऊन भर उन्हात व रात्रीला पाणी भरण्याची वेळ आली आहे़ भोसा या गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने गोरगरीब आदिवासी बहुल लोकांना दिवसभर मोलमजुरी करुन पोट भरावे का पाणी आणावे अशी बिकट परिस्थिती भोसा गावात निर्माण झाली आहे. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी तलावात भोसा ग्रामपंचायतने साठा राखीव ठेवून उर्वरित पाणी शेती सिंंचनास द्यायला हवा हाेता़ परंंतु भोसा ग्रामपंचायतच्या नियोजन शून्य कारभारामुळे मार्च अखेर पर्यंत तलावातून पाणी उपसा सुरु हाेता़ त्यामुळे संपूर्ण तलावातील पाणी शेती सिंचनासाठी वापरल्याने तलाव काेरडाठाक पडला आहे़ त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती हाेत आहे़
सीईओंनी दिले चाैकशीचे आदेश
जि.प.च्या सीईओ भाग्यश्री विसपुते यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी भोसा गावाच्या भीषण पाणीटंंचाई बाबत तत्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले़ मेहकर पं. स. गटविकास अधिकारी यांच्याशी दोन वेळा दूरध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दूरध्वनी उचलला नसल्याने संपर्क हाेऊ शकला नाही़