चिखलीत हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:35 IST2021-05-10T04:35:13+5:302021-05-10T04:35:13+5:30
चिखली : सद्यस्थितीत ऑक्सिजनची कमतरता पाहता जिल्ह्यातील काही तालुक्यात हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा प्लांट बसविल्या जात आहेत. मात्र, यातून ...

चिखलीत हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारा !
चिखली : सद्यस्थितीत ऑक्सिजनची कमतरता पाहता जिल्ह्यातील काही तालुक्यात हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा प्लांट बसविल्या जात आहेत. मात्र, यातून चिखली ग्रामीण रूग्णालयास वगळण्यात आले आहे. हा प्रकार येथील रूग्णांना वाऱ्यावर सोडण्यासारखा असल्याने चिखली येथे ऑक्सिजनची आवश्यकता पाहता येथे सुध्दा हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा प्रकल्प उभारण्यात यावा, अशी मागणी आमदार श्वेता महाले यांनी कोरोनाच्या आढावा बैठकीत केली आहे .
बुलडाणा येथील नियोजन विभागाच्या सभागृहात ९ मे रोजी कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव, जि.प.अध्यक्षा मनिषा पवार, आमदार डॉ.संजय कुटे, आ.अॅड.आकाश फुंडकर, आ.राजेश एकडे, आ.संजय गायकवाड, जिल्हाधिकारी एस.राममूर्ती, जि.प.मुख्य कार्यपालन अधिकारी भाग्यश्री विसपुते, पोलीस अधीक्षक चावरीया, निवासी जिल्हाधिकारी दिनेश गीते, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोगटे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सांगळे, डॉ.वासेकर यांची उपस्थिती होती. या बैठकीत आ.महालेंनी चिखली ग्रामीण रुग्णालयाची दर्जावाढ होऊन उपजिल्हा रुग्णालय झालेले आहे. तसेच चिखली येथे समर्पित कोविड हेल्थ सेंटर व ट्रामा केअर सेंटर सुद्धा सुरू असल्याने येथे ऑक्सिजनची नितांत गरज भासणार असल्याचे निदर्शनास आणून देत याठिकाणी हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट उभारण्याची मागणी केली.
स्त्री रुग्णालयात व्हेंटिलेटर बेड वाढवा
स्त्री रुग्णालय बुलडाणा येथे २६ व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहेत. आता पुन्हा नव्याने ४ बेड वाढविण्यात आल्याने एकूण संख्या ३० झालेली आहे. परंतु ही संख्या सुद्धा अपुरी पडत असून भविष्यात वाढणारी रूग्णसंख्या आणि तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता जिल्ह्यात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड मोठ्या प्रमाणावर वाढविण्याची गरज असल्याचे आ.महालेंनी या बैठकीत स्पष्ट केले आहे.
लहान मुलांसाठी एनआयसीयू तयार ठेवा !
तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाची बाधा होणार असल्याची देखील शक्यता सांगितल्या जात आहे. आताच १ ते १० वर्षाच्या मुलांना कोरोनाची लागण झालेली आहे. लहान मुलांना सुद्धा व्हेंटिलेटरची गरज पडणार आहे. त्यामुळे वेळेवर व्यवस्था करण्याऐवजी आतापासूनच तशी व्यवस्था करण्याबाबत आ.महालेंनी या बैठकीत लक्ष वेधले आहे.
रेमडेसिविरचे दुष्परिणाम जनतेसमोर मांडा
गरज नसताना रेमडेसिविर इंजेक्शन सर्रासपणे कोरोना रुग्णांना दिल्या जात आहे. रेमडेसिविर हे कोरोनाच्या उपचारासाठी लागू नाही हे डब्ल्यूएचओने सुद्धा सांगितले आहे. त्यातच रेमडेसिविरचे घातक दुष्परिणाम आता समोर येत असून विविध आजार होत असल्याने रेमडेसिविरचे दुष्परिणाम जनतेसमोर आणण्याबाबत देखील उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी सुद्धा आ.महाले पाटील यांनी केली आहे.